पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर सोनू निगमकडून नाराजी व्यक्त; म्हणाला “त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही..”
नुकतीच पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. या घोषणेनंतर गायक सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करूनही काही कलाकारांना आतापर्यंत पद्म पुरस्कार मिळाले नाहीत, असं त्याने म्हटलंय.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी 25 जानेवारी रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सात जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र या पद्म पुरस्कारांच्या घोषणेनंतर प्रसिद्ध गायक सोनू निगमने नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने या पुरस्कारांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. किशोर कुमार, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान यांसारख्या गायक-गायिकांना अद्याप पद्म पुरस्कार का दिला गेला नाही, असा सवाल त्याने केला आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय म्हणाला सोनू निगम?
दोन असे गायक ज्यांनी संपूर्ण जगातील गायकांना प्रेरणा दिली आहे. एकाला तर आपण पद्मश्रीवरच संपवलं आहे, ते आहेत मोहम्मद रफी साहब आणि एक आहेत, ज्यांच्या नशिबी पद्मश्रीसुद्धा नाही. ते म्हणजे किशोर कुमारजी. मरणोत्तर पुरस्कार मिळत आहेत ना? आता जे आहेत त्यापैकी अल्का याज्ञिकजी.. ज्यांचं करिअर इतकं मोठं आणि कमालीचं आहे. त्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही. श्रेया घोषालसुद्धा बऱ्याच काळापासून आपल्या कलेद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकतेय. तिलासुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे. सुनिधी चौहानने तिच्या वेगळ्या आवाजाने एका संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. तिलासुद्धा आतापर्यंत काहीच मिळालं नाही. गायन असो, अभिनय असो किंवा विज्ञान असो.. इतरही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना न्याय मिळाला नाही असं तुम्हाला वाटत असेल तर, त्यांची नावं कमेंट्समध्ये लिहा.
View this post on Instagram
सोनू निगमच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी विविध कलाकारांची नावं लिहिली आहेत. दिवंगत गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा लहरीनेही कमेंट करत नाराजी व्यक्त केली. ‘बरोबर बोललात सोनू निगम सर. भारतीय संगीताचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या माझ्या वडिलांसारख्या व्यक्तीला तो पुरस्कार कधीच मिळाला नाही, हे खरोखरच निराशाजनक आणि अन्याय्य आहे. ते फक्त एक संगीत दिग्दर्शकच नव्हे तर ट्रेंड सेटरसुद्धा होते. त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती कधीच मिळाली नाही. संगीतासाठी आपलं जीवन अर्पण करणाऱ्या व्यक्तीला मान्यता मिळत नाही हे पाहून खूप वाईट वाटतं. परंतु त्यांचा वारसा हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त बोलका आहे’, असं त्याने लिहिलंय.
