Vicky Kaushal : “उभे रहा, नजर काढायची आहे तुमची…” विकी कौशलची कोणी काढली दृष्ट? Video Viral
Chhaava : अभिनेता विकी कौशल याचा "छावा" चित्रपट हा सध्या मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली आहे.

Chhaava : अभिनेता विकी कौशल याचा “छावा” चित्रपट हा सध्या मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली असून त्याच्याशिवाय रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. त्याशिवाय अनेक मराठमोळ्या कलाकारांनीसुद्धा छावा चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली आहे. ‘हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं।’ , ‘फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती, अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की भी जुर्रत की।’ असे एकाहून एक खास डायलॉग विकी कौशलच्या तोंडी या चित्रपटात असून त्याच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि विदेशातही “छावा” सध्या गाजत असून अवघ्या आठवड्याभरातच त्याने रग्गड कमाई केली आहे. सलग सातव्या दिवशीदेखील “छावा”ची घोडदौड सुरू असून बॉक्स ऑफीसवर तूफान कमाई सुरू आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने सिनेमाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
विकीचं कौतुक
या चित्रपटासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतली असून फक्त व्यायाम करून फिळदार शरीर कमावलं नाही. तर त्याने संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी घोडेस्वारी,तलवारी बाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं. त्यासाठी त्याने कानही टोचून घेतले. या चित्रटात त्याचे अनेक मराठी संवादही असून त्याच्या डायलॉग डिलीव्हरीवरही प्रेक्षक फिदा आहेत. या भूमिकेप्रती विकीचं समर्पण पाहून नेटकरीसुद्धा त्याचं कौतुक करत आहेत. त्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असून प्रेक्षकांकडूनही तो नावाजला जातोय.
खास व्यक्तीने काढली विकी कौशलची दृष्ट
चारही स्तरातूंन होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावामुळे विकी भारावला असून त्याच्या घरातील एका खास व्यक्तीनेही त्याचं अनोख्या पद्धतीने कौतुक केलं आहे. खुद्द विकीनेच या संदर्भात त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक महिला विकी कौशलची दृष्ट काढतानाचा व्हिडीओ दिसत आहे. त्यासह विकीने खास कॅप्शनही लिहीली आहे.
View this post on Instagram
“आशा ताईंनी मला मोठं होताना पाहिलंय.. उंचीनेही आणि आयुष्यातही. काल त्यांनी ‘छावा’ पाहिला आणि आग्रह धरला.. “उभे राहा, नजर काढायची आहे तुमची.” माझ्याप्रती प्रेम व्यक्त करण्याचा आणि अतिच्या गोष्टींपासून माझं रक्षण करण्याचा त्यांचा हा नेहमीचा मार्ग आहे. त्या माझ्या आयुष्यात असल्याचा मला खूप आनंद आहे” , असं विकीने लिहीलं आहे.
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत कौतुक केलं आहे.


