Hera Pheri 3 : परेश रावल यांना पटली नाही अक्षयची ‘हेरा फेरी’? चित्रपट सोडण्यामागचं खरं कारण आलं समोर
परेश रावल यांनी त्यांच्या वकिलामार्फत अक्षय कुमारच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. त्यांनी 'हेरा फेरी 3' हा चित्रपट अचानक का सोडला, यामागचं सविस्तर कारण या नोटिशीत सांगितलं आहे. परेश रावल यांनी व्याजासह साइनिंग रक्कमसुद्धा परत केली आहे.

‘हेरा फेरी’ या गाजलेल्या कॉमेडी चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी साइनिंग अमाऊंट घेतल्यानंतर आणि टीझरसाठी शूटिंग केल्यानंतर अभिनेते परेश रावल यांनी अचानक माघार घेतली. त्यानंतर चित्रपटाचा सहनिर्माता असलेल्या अक्षय कुमारने त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर परेश यांनी स्वीकारलेले 11 लाख रुपये व्याजासह परत केले. त्याचसोबत चित्रपट का सोडला, याचंही कारण त्यांनी सांगितलं आहे.
परेश रावल यांनी नोटिशीला दिलेल्या उत्तरातील मुद्दे-
- कायदेशीर गोष्टींचा विचार न करता परेश रावल यांनी विश्वासाने टर्मशीटवर स्वाक्षरी केली होती.
- आयपीएल फायनलची डेडलाइन पाळण्यासाठी प्रमोशनल व्हिडीओ खूपच घाईत शूट करण्यात आले होते. परेश रावल यांनी सातत्याने या घाईबद्दल प्रश्न विचारले होते.
- 11 लाख रुपये साइनिंग अमाऊंट आणि त्यावर 15 टक्के व्याज, अशी संपूर्ण रक्कम नोटिशीच्या आधीच परत करण्यात आली होती. प्रॉडक्शन हाऊसने पैसे आणि करार संपुष्टात आल्याचं स्वीकारलं होतं.
- ‘हेरा फेरी 3’च्या शीर्षकाच्या मालकीसंदर्भात शाश्वती नव्हती. फिरोज नाडियादवाला आणि अक्षय कुमार यांच्यातच त्यावरून कायदेशीर वाद सुरू आहेत.
- परेश रावल यांच्या एग्झिटमागचं कारण फक्त क्रिएटिव्ह पातळीवरील मतभेद नाहीत. तर यात कुठेच स्क्रिप्ट नव्हती, प्रॉडक्शन शेड्युल तयार नव्हतं, कुठलाच मोठा करार नव्हता आणि फ्रँचाइजीच्या शीर्षकाबद्दल सुरू असलेले वाद यांचाही समावेश होता.
2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ आणि 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिर हेरा फेरी’ या दोन्ही चित्रपटांच्या बौद्धिक संपत्तीचे अधिकार हे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्याकडे आहेत. त्यांनी अक्षय कुमार, प्रियदर्शन, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. ‘हेरा फेरी’ फ्रँचाइजीशी संबंधित कोणत्याही जाहिराती, प्रोमो किंवा इतर कुठलंही शूट करू नका, असं त्यांना सांगण्यात आलंय. असं केल्यास ते जाणूनबुजून कराराचं उल्लंघन मानलं जाईल, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं होतं. या सगळ्या गोंधळामुळेच परेश रावल यांनी कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे माघार घेतल्याचं कळतंय.
‘हेरा फेरी 3’ची कोणतीच ठोस स्क्रीप्ट अद्याप तयार नाही. त्यासाठी कलाकारांना किती वेळ द्यावा लागणार होता हे सुद्ध अस्पष्ट होतं. त्यामुळे परेश रावल यांनी त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांच्या वकिलांनी म्हटलंय. ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने परेश रावल यांना ‘हेरा फेरी 3’बद्दल सांगितलं होतं.
