तीन दिवसात तीन हत्या; उपराजधानी हादरली

तीन दिवसात तीन हत्येच्या घटना घडल्याने नागपुरात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 17:36 PM, 19 Oct 2020

नागपूर : मागील तीन दिवसात झालेल्या तीन हत्यांनी राज्याची उपराजधानी हादरली आहे. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (3 murders in 3 days, Nagpur city in shock by the killings)

तीन दिवसात तीन हत्येच्या घटना घडल्याने नागपुरात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातील पहिली घटना मानकापूर परिसरात घडली आहे. मानकापूर येथे अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.

क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या घटनेतील मृतकाचे नाव बनारसी असून त्याचे आरोपी गौरव गायकवाड याच्यासोबत दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्यात आरोपीने दगडाने ठेचून बनारसीची हत्या केली होती.

हत्येची दुसरी घटना नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. गाडीचा धक्का लागल्याने वाद घालत दोन बालकांनी धारदार शस्त्राने घाव घालत एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मृतक राजू रंभाड हे पिठाच्या गिरणीवर दळण दळण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी करण यादव, शुभम वंजारी स्कुटीवरुन जात होते. त्यावेळी राजू रंभाड यांना स्कुटीचा धक्का लागला. त्यावरून करण, शुभम आणि राजू यांच्यात वाद सुरू झाला.

यावेळी आरोपी करण यादव याने खिशातून चाकू काढत राजू यांच्यावर सपासप वार केले. त्यानंतर जखमी राजू यांना रस्त्यावर खाली पाडून दोन्ही आरोपी पळून गेले. त्यानंतर परिसरातील लोकांनी जखमी राजू रंभाड यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारांदरम्यान राजू यांचा मृत्यू झाला.

यासंदर्भात यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सह पोलीस उपायुक्त स. दि. कार्यकर्ते यांनी दिली आहे.

हत्येची तिसरी घटना शहरातील कपिल नगर भागात घडली आहे. बहिणीला त्रास देणाऱ्याला हटकले म्हणून दीपक राजपूत यांची हत्या करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणांवरून घडत असलेल्या या हत्या पाहता नागपुरातील गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या

जालन्यात वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्वस्त, हॉटेल मालकासह दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

गाडीत पेट्रोल भरलं की पाणी?, जाब विचारणाऱ्या तरुणांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची जबर मारहाण

CCTV | एपीएमसी मार्केटमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षकाला परप्रांतीय मजुरांची मारहाण

लग्नास नकार दिल्यानं तरुणीला मारहाण, कल्याण पोलिसांनी प्रियकराला 2 तासात ठोकल्या बेड्या

(3 murders in 3 days, Nagpur city in shock by the killings)