Donald Trump : भारतीय वंशाच्या पोराची कमाल, डोनाल्ड ट्रम्प यांची लाज राखली, मिळवून दिलं मोठं यश!
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. पण भारतीय वंशाच्या एका मुलाने अमेरिकेचे नाव जगभरात पोहोचवले आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भारतविरोधी धोरण राबवताना दिसत आहेत. टॅरिफनंतर त्यांनी एचवनबी व्हिसाच्या शुल्कात वाढ केली असून त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. ट्रम्प यांना भारतीय कुशल कामगार अमेरिकेत नको आहेत, असे म्हटले जात आहे. असे असतानाच ट्रम्प यांना भारतीय नको असले तरी एका भारतीय वंशाच्याच मुलामुळे अमेरिकेचे जगात नाव झाले आहे. याच मुलाचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा फाटा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो आला समोर
अमेरिकेने नुकतेच 2025 सालाच्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. या स्पर्धेत अमेरिकेने सर्व पाच सुवर्णपदकं जिंकली. विजेत्यांच्या या संघात भारतीय वंशाच्या अगस्त्य गोयल याचादेखील समावेश आहे. गोयल या मुलासोबतच पाच जणांच्या टीममध्ये एलन ली, जोशुआ वांग, फियोडोर येवतुशेंको आणि ब्रायन झांग यांचा समावेस आहेत. याच पाच जणांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. ट्रम्प यांचे वरिष्ठ सहाय्यक मायकल क्रॅटसियोस यांनी हा फोटो शेअर केला आहे. POTUS आणि WHOSTP47 यांना 2025 सालच्या विश्व विजेत्यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाला. या टीमने आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलम्पियाड स्पर्धेत अमेरिकेचा दबदबा कायम ठेवला, असे यावेळी मायकल यांनी म्हटले आहे.
अगस्त्य गोयल नेमके कोण आहेत?
पाच जणांच्या टीममध्ये अगस्त्य गोयल या 17 वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाचा समावेश आहे. अगस्त्य कॅलिफोर्नियाच्या पालो ऑल्टो येथील हेन्री एम गन उच्च महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. अगस्त्य हा स्टँडफोर्डमध्ये प्राध्यापक असलेल्या आशिष गोयल यांचा मुलगा आहे. त्याने इंटरनॅशनल ऑलम्पियाड इन इन्फॉर्मेटिक्स स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. अगस्त्यच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीची तुलना त्याच्या वडिलांशी केली जाते. प्रोफेसर आशिष गोयल हेदेखील फार हुशार आहेत. त्यांनी 1990 साली आयआयटी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले होते.
अगस्त्यने आतापर्यंत काय काय केलेले आहे?
अगस्त्यच्या शैक्षणिक प्रवासाचा आलेख सर्वांनाच थक्क करणार आहे. त्याने 2022-2024 अशी सलग तीन वर्षे यूएसए कम्प्यूटिंग ऑलम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली आहे. 2023 साली यूएसए फिजिक्स ऑलम्पियाड स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकलेले आहे. त्याने मॅथेमॅटिकल ऑलम्पियाड स्पर्धेतही भाग घेतलेला आहे. 2021-2024 या काळात Euler Circle येथे पार्टटाईम रिसर्चर म्हणूनही काम केलेले आहे. गणिताच्या रिसर्च पेपरवरही त्याने सहलेखक म्हणून काम केलेले आहे.
