Donald Trump : सतत भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची दिवाळी सणाच्या दिवशी एक चांगली कृती, एक चांगलं पाऊल
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या भारतविरोधाने पछाडलं आहे, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. ते सतत भारत विरोधी भूमिका घेत असतात. भारताला नडण्याचा त्यांचा पवित्रा असतो. पण आता दिवाळी सणाच्या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प यांनी एक चांगली कृती केली आहे, चांगलं पाऊल उचललं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सतत भारताला नडण्याची भूमिका घेत असतात. टॅरिफपासून अन्य बाबतीत त्यांनी अलीकडे बरेच भारत विरोधी निर्णय घेतले आहेत. पण आता तमाम भारतीयांचा प्रिय सण असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी एक चांगली कृती केली आहे. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्हाइट हाऊसमधून एक खास संदेश प्रसारीत झाला. ‘वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय’ म्हणजे दिवाळीचा सण असं त्यात म्हटलं आहे. हा सण आत्मनिरीक्षण,सद्भाव आणि पुनर्जन्माची संधी देतो. कुटुंब आणि समाजाला एकजूट करतो असं ट्रम्प यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
“आज मी दिवाळी साजरी करणाऱ्या प्रत्येक अमेरिकी नागरिकाला शुभेच्छा देतो. हा कुटुंब, मित्र परिवाराला एकत्र आणून सेलिब्रेट करण्याचा, आशेपासून शक्ती प्राप्त करण्याचा आणि एक स्थायी भावना स्वीकारण्याची वेळ आहे. दीवे आणि मेणबत्तीच्या प्रकाशातून चांगल्याने वाईटावर विजय मिळवल्याचा संदेश जातो” असं ट्रम्प आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.
दिवाळीला अमेरिकेत कुठे-कुठे सुट्टी असते?
भारतीय संस्कृती आणि दिवाळी अमेरिकेत सतत लोकप्रिय होत आहे. न्यू यॉर्क शहरात 2023 पासून दिवाळी सणाला अधिकृतरित्या सुट्टी घोषित करण्यात आली आहे. यंदा पहिल्यांदाच न्यू जर्सीच्या एडिसन, साउथ ब्रंसविक आणि जर्सी सिटी या शहरात दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी सुट्टी असते.
‘प्रकाशोत्सव’ नावाने भव्य समारंभ
कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रांसिस्को, लॉस एंजिल्स आणि सॅन जोसमध्ये दरवर्षी ‘प्रकाशोत्सव’ नावाने भव्य समारंभ आयोजित केला जातो. इथे अधिकृत सुट्टी नसते पण स्थानिक प्रशासन भारतीय समुदायाच्या सहकार्याने एका सांस्कृतिक उत्सवाच्या स्वरुपात दिवाळी सण साजरा केला जातो. टेक्सासच्या ह्यूस्टन आणि डलास, इलिनॉयच्या शिकागो, जॉर्जियाच्या अटलांटा शहरात दिवाळी लोकप्रिय आहे. मंदिरं आणि सामुदायिक केंद्रात दिवाळी जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शानदार प्रकाश शो आयोजित केले जातात.
हे ट्रम्प यांच्या संदेशातून सिद्ध होतं
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये मागच्या काही वर्षांपासून व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरु झाली आहे. भारतीयांचा हा सण अमेरिकेच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे, हे ट्रम्प यांच्या संदेशातून सिद्ध होतं. अमेरिकेत राहणारे लाखो अनिवासी भारतीय अमेरिकी नागरिकांसह उत्साहाने दिवाळी सण साजरा करतात.
