Donald Trump: असीम मुनीरने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला खास बॉक्स, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये असीम मुनीर हे ट्रम्प यांना एक बॉक्स दाखवत आहेत.

अमेरिकेने आपल्या निर्णयांमुळे जगात खळबळ माजवली आहे. अशातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये असीम मुनीर हे ट्रम्प यांना एक बॉक्स दाखवत आहेत. यात पाकिस्तानमध्ये आढळणारी काही दुर्मिळ खनिजे आहेत. यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
असीम मुनीरने ट्रम्प यांच्यासाठी नेलेल्या बॉक्समध्ये काय आहे?
शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. याचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोचतत पाकिस्तानी नेते ट्रम्प यांना रंगीबेरंगी दगड असलेला एक लाकडी बॉक्स दाखवताना दिसत आहेत. यातील दोन मोठे दगड बॅस्टझेनाइट आणि मोनाझाइट असल्याचे समोर आले आहे. यात सेरियम, लॅन्थॅनम आणि निओडायमियम सारखी दुर्मिळ खनिजे असतात. याची माहिती हे नेते ट्रम्प यांना देत आहेत.
पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात तेल, वायू आणि खनिजांचे साठे आहेत. काही साठे हे बलुचिस्तान आणि खैबर-पख्तूनख्वा प्रदेशात आहेत. हे साठे व्यावसायिकदृष्ट्या फासरे महत्त्वाचे नाहीत, मात्र तरीही पाकिस्तानी नेते याची माहिती अमेरिकेला देत असून खाजगी अमेरिकन फर्मसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा करार अमेरिकेसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो. कारण यामुळे अमेरिकेचे पाकिस्तानवरील वर्चस्व वाढेल आणि आशियातील दबदबाही वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अशा कराराचा परिणान आशियातील अनेक देशांवर होण्याची शक्यता आहे.
चीन नाराज
चीनकडे मोठ्या प्रमाणात दुर्मिळ खनिजांचा साठा आहे. चीन अमेरिकेलाही ही खनिजे पुरवतो. मात्र आता जर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात खनिजांबाबत करार झाला तर चीनला फटका बसण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या करारामुळे चीनचे वर्चस्व कमी होऊ शकते. काही अहवालांनुसार अमेरिकेचे डोळे बलुचिस्तानच्या दुर्मिळ खनिजांच्या साठ्यावर आहेत, तर चीनही अशाच खनिजांच्या शोधात आहे. त्यामुळे पाकिस्तानमुळे आगामी काळात या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
