कॅलिफोर्नियात क्लिनिकबाहेर स्फोट, एकाचा मृत्यू; FBI कडून दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट
कॅलिफोर्नियातील एका क्लिनिकबाहेर बॉम्बस्फोट झाल्याचं समजत असून त्याच एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचं एफबीआयने स्पष्ट केलं आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.

कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज इथल्या फर्टिलिटी क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या स्फोटात किमान चार जण जखमी झाले आहेत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) या घटनेला जाणीवपूर्वक केलेलं दहशतवादी कृत्य असं म्हटलंय. हा दहशतवादी हल्ला असल्याचं FBI ने स्पष्ट केलंय. या स्फोटामुळे क्लिनिकचं मोठं नुकसान झालं असून आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्या आणि दरवाजे उडून गेले. याविषयी एफबीआयच्या लॉस एंजेलिस कार्यालयाचे प्रमुख अकिल डेव्हिस म्हणाले, “क्लिनिकला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं होतं.” हा दहशतवादी हल्ला असल्याचा निष्कर्ष कसा काढला याबाबत त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. त्याचप्रमाणे स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
ज्या व्यक्तीचा स्फोटात मृत्यू झाला, ती व्यक्ती संशयित आहे की नाही हे अद्याप डेव्हिस यांनी सांगितलं नाही. परंतु इतर कोणत्या संशयिताचा शोध सुरू नसल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचा तपास संभाव्य कार चोरी म्हणून केला जात आहे. मृत्य व्यक्तीनेच स्फोट घडवून आणला असावा, असा संशय तपासकर्त्यांना असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला दिली. परंतु तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्हजवळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. सध्या लोकांना या परिसरात येणं टाळण्याचा सल्ला पोलिसांना दिला आहे.
‘अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स’ क्लिनिक चालवणारे डॉ. माहेर अब्दुल्ला यांनी त्यांच्या क्लिनिकचं नुकसान झाल्याची माहिती दिली. तर क्लिनिकमधील सर्व कर्मचारी, आयव्हीएफ लॅब आणि गर्भदेखील सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बॉम्बस्फोटामुळे क्लिनिकच्या इमारतीच्या भिंतीला मोठं छिद्र पडल्याचं आणि संपूर्ण इमारतीचं नुकसात झाल्याचं पहायला मिळतंय. दरम्यान कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना स्फोटाची माहिती देण्यात आली आहे.
