नेपाळनंतर आता पाकिस्तानचे सरकार कोसळणार? Gen-Z आंदोलक रस्त्यावर, शरीफ-मुनीर चिंतेत
Gen-Z Protest in Pakistan: नेपाळमध्ये Gen-Z आंदोलकांच्या आंदोलनानंतर सरकार कोसळले आहे, त्यानंतर आता पाकिस्तानातही Gen-Z आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलकांच्या आंदोलनानंतर सरकार कोसळले आहे, त्यानंतर आता पाकिस्तानातही Gen-Z आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात विद्यार्थी किंवा तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. वाढलेली फी आणि असुविधा याविरोधात मुझफ्फराबाद येथील एका विद्यापीठात शाहबाज सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली आहेत. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Gen-Z आंदोलकांनी सुरुवातीला शांततेत आंदोलन सुरु केले, मात्र काही काळानंतर एका अज्ञात बंदूकधाऱ्या व्यक्तीने विद्यार्थ्यांवर गोळीबार केला, त्यामुळे परिस्थिती बिघडली. या गोळीबारात एक एक विद्यार्थी जखमी झाला. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात पोलीसांच्या गोळीबाराच्या भीतीने विद्यार्थी सैरावैरा पळताना दिसत आहेत. यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले आणि जाळपोळ केली, यात काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
इंटरमिजिएटचे विद्यार्थ्यांचाही सहभाग
या आदोलनावेळी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. हे आदोलन नेपाळ आणि बांगलादेशमधील Gen-Z आंदोलनासारखे आहे. कारण इंटरमिजिएटचे विद्यार्थीही या आंदोलनात सामील झाले होते. विद्यार्थ्यांचा मुख्य मुद्दा मॅट्रिक्युलेशन आणि इंटरमिजिएट स्तरावर लागू केलेली नवीन ई-मार्किंग किंवा डिजिटल मूल्यांकन प्रणाली हा होता.
इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षाचे निकाल 30 ऑक्टोबरला जाहीर झाले. यात अनेकांना कमी गुण मिळाल्यामुळे नाराजी पसरली होती. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकांमध्ये घोळ आहे. शिक्षण मंडळाने याबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. यानंतर आता विद्यार्थ्यांनी पुनर्तपासणी लागणारी फी माफ करण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात 12 लोकांचा मृत्यू
पीओके मध्ये महिनाभरापूर्वीही आंदोलन झाले होते. त्यावेळी 12 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी विद्यार्थी आणि नागरिक 30 मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केले होते. यात कर सवलत, वीजेवरील अनुदान आणि विकास प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याबाबतच्या मागण्याचा समावेश होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानात आंदोलक रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारची चिंता वाढली आहे.
