भारताने दिलं जशाच तसे उत्तर, तर कॅनडाच्या पंतप्रधानांनी घेतली मवाळ भूमिका
India vs Canada : भारताने क्रॅनडाला जोरदार प्रत्यूत्तर दिल्यानंतर आता कॅनडाच्या पंतप्रधानांनी सावध भूमिका घेतली आहे. आधी भारतावर आरोप करणारे कॅनडाच्या पंतप्रधान आता मवाळ झाले आहेत. भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबत इशारा ही दिला आहे.

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर ( Hardeep Singh Nijja ) याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो ( Canadian Prime Minister Justin Trudeau ) यांनी दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढवला आहे. कॅनडाने भारतीय अधिकारी पवन कुमार राय ( Pawan Kumar rai ) यांना देशातून जाण्यास सांगितले. यानंतर भारतानेही कडक भूमिका घेतली आणि कॅनडाच्या एका उच्चपदस्थ राजनयिकाला परत पाठवले.
भारताकडून कॅनडाला जोरदार प्रत्युत्तर
भारताकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाल्यानंतर जस्टिन ट्रुडो ( Justin Trudeau ) आता मवाळ झाले आहेत. मंगळवारी जस्टिन ट्रुडो म्हणाले की, कॅनडा भारताला चिथावणी देऊ इच्छित नाही. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आम्ही प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न करत नाहीये. आम्ही तथ्ये मांडत आहोत. आम्हाला भारत सरकारसोबत काम करायचे आहे. हे अत्यंत गंभीर असून आंतरराष्ट्रीय कायद्यात त्याचे दूरगामी परिणाम होतील. आम्ही आमच्या लोकशाही तत्त्वांना आणि मूल्यांना धरुन आहोत.
कॅनडाच्या संसदेत काय म्हणाले जस्टिन ट्रूडो
जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत सांगितले होते की, हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येप्रकरणी भारत सरकारच्या एजंटशी संबंध असल्याची माहिती आहे. कॅनेडियन सुरक्षा एजन्सी गेल्या अनेक आठवड्यांपासून या विश्वासार्ह आरोपांचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहेत. भारताने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप हास्यास्पद आणि प्रेरित आहे.
भारतीय नागरिकांना गाईडलाईन्स जारी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कथित हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, कॅनडाच्या सरकारने मंगळवारी भारतात राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी एक गाईडलाईन जारी केली. भारतात राहणाऱ्या कॅनेडियन नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे त्यात म्हटले आहे. देशभरात दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. परिस्थिती झपाट्याने बदलू शकते. नेहमी सतर्क रहा. स्थानिक माध्यमांचे निरीक्षण करा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.
