2005 साली जन्मलेल्या महिलांना मुलंच होणार नाही; नव्या धक्कादायक अहवालाने खळबळ!
जपानमध्ये कमी झालेला जन्मदर मोठी समस्या म्हणून डोकं वर काढतोय. येथे महिला उशिराने लग्न करत आहेत. त्यामुळे आई न होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या देशापुढे नवे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Japan Women Marriage Age : जपानमध्ये लोकसंख्या वेगाने कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच या देशात लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या देशात महिला एक तर उशिराने लग्न करत आहेत किंवा महिलांनी मुल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळेच या देशातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण कमी झालेले असल्याचे सांगितले जात आहे. 2023 साली जपान सरकारचा एक रिपोर्ट आला होता. या रिपोर्टनुसार महिलांचे मुल जन्माला घालण्याचे वय वाढणे हे मोठे संकट आहे, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्टोरिटी रिसर्चने (आयपीएसएस) ऑगस्ट 2023 साली हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टमध्ये जपानमध्ये 2005 साली जन्माला आलेल्या महिलांपैकी एक तृतियांश महिला मुल जन्माला घालू शकणार नाहीत, असे सांगण्यात आलेले आहे.
या महिला मुल जन्माला घालू शकणार नाहीत
आयपीएसएस संस्थेच्या अंदाजानुसार 2005 साली जन्माला आलेल्या महिलांपैकी साधारण 33.4 टक्के महिला मुल जन्माला घालू शकणार नाहीत. फारच चांगली स्थिती असेल तर मुल जन्माला न घालू शकणाऱ्या महिलांचे प्रमाण हे कमीत कमी 24.6 टक्के असू शकते. फारच खराब स्थिती असेल तर एकूण 42 टक्के महिला मुल जन्माला घालू शकणार नाहीत, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले आहे. हीच बाब लक्षात घेऊन जपानचे तत्कालीन पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी लोकसंख्या वाढावी यासाठी सरकारतर्फे काही पावलं उचलली जातील, असे सांगितले होते. तीन मुलं असणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत केली जाईल, असेही त्यांनी म्हटले होते.
जपानी महिला कोणत्या वर्षात लग्न करतात?
जपानी महिला आधीच्या तुलनेत खूप उशिराने लग्न करतात. आयपीएसएस संस्थेचे संचालक मिहो इवासावा यांच्या मतानुसार महिला उशिराने लग्न करत आहेत त्याचा परिणाम जन्मदरावर पडत आहे. शासकीय आकड्यांनुसार 2020 साली जपानी महिलांचे पहिल्यांदा लग्न करण्याचे सरासरी वय 29.4 वर्षे होते. 1985 सालाच्या तुलनेत महिलांच्या लग्नाचे वय चार वर्षांनी वाढले आहे.
दरम्यान, महिला उशिराने लग्न करत असल्यामुळे आता जपानमध्ये लोकसंख्या कमी होत आहे. तेथील महिला 30 वर्षे वयाच्या आसपास लग्न करत असल्याने त्यांना एकच आपत्य होते. असे निरीक्षण इवासावा यांनी नोंदवलेले आहे. त्यामुळे आता जपान घटलेल्या जन्मदरावर काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
