पाकिस्तानचे तुकडे होणार? या नवीन देशाच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर, भारताशी खास संबंध
Sindhudesh : पाकिस्तानात आणखी एका नवीन देशाची मागणी जोर धरू लागली आहे. सिंधी सांस्कृतिक दिनानिमित्त कराचीमध्ये स्वतंत्र सिंधुदेश ची मागणी करत स्वातंत्र्य मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानात गेल्या काही काळापासून अस्थिरता आहे. अनेकदा पाकिस्तानच्या सैन्यावर आणि पोलीसांवर हल्ले झाले आहेत. अशातच आता पाकिस्तानात आणखी एका नवीन देशाची मागणी जोर धरू लागली आहे. सिंधी सांस्कृतिक दिनानिमित्त कराचीमध्ये स्वतंत्र सिंधुदेश ची मागणी करत स्वातंत्र्य मोर्चा काढण्यात आला होता. जय सिंध मुत्ताहिदा महाज (JSMM) च्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘सिंधुदेशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. पोलीसांनी अचानक मोर्चाचा मार्ग बदलल्यामुळे जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मोर्चेकरी आणि पोलीस यांच्यातील चकमकीत 5 पोलीस जखमी झाले आहेत.याप्रकरणी 45 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
कराचीमध्ये स्वतंत्र सिंधुदेशाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र पोलीसांनी मोर्चाचा मार्ग अचानक बदलल्याने मोर्चेकरी आक्रमक झाले. मोर्चातील लोकांनी दगडफेक केली, त्यामुळे तणाव वाढला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या प्रकरणी 45 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्यांच्यावर पोलीसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे.
सिंधुदेशच्या मागणीला वेग
काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक दिवस सिंध भारतात परत येईल असे विधान केले होते. नवी दिल्लीतील सिंधी समुदायाच्या परिषदेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, आमच्या पिढीतील अनेक सिंधी हिंदूंनी 1947 च्या निर्णयाला कधीही पूर्णपणे स्वीकारले नाही ज्यामुळे सिंध पाकिस्तानचा भाग झाला. सिंध नेहमीच सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहे. सिंध आज भारताचा भाग नसला तरी भविष्यात तो भारतात सामील होऊ शकतो. त्यानंतर आता पाकिस्तानात सिंधुदेशाची मागणी वाढली आहे.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील लोकही वेगळ्या देशाच्या निर्मितीसाठी आंदोलन करत आहेत. त्यानंतर आता सिंधुदेशासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारची अडचण वाढली आहे. हे दोन्ही प्रांत पाकिस्तानातून बाहेर पडू इच्छित आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही प्रांत भारताबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे आगामी काळात सिंध प्रांत हा भारतात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
