नरेंद्र मोदींच्या बरोबरीने 'गोलकीपर्स अवॉर्ड'मध्ये सन्मानित ही भारतीय युवती कोण?

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला आहे. याचवेळी राजस्थानातील 17 वर्षीय युवती पायल जांगीड हिचाही ‘चेंजमेकर अवॉर्ड’ने गौरव (Payal Jangid Goalkeepers19) करण्यात आला. राजस्थानातील बालमजुरी आणि बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा रोखण्यात पायलचा मोलाचा वाटा आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’मध्ये सन्मानित झाल्याचा अतीव …

नरेंद्र मोदींच्या बरोबरीने 'गोलकीपर्स अवॉर्ड'मध्ये सन्मानित ही भारतीय युवती कोण?

न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला आहे. याचवेळी राजस्थानातील 17 वर्षीय युवती पायल जांगीड हिचाही ‘चेंजमेकर अवॉर्ड’ने गौरव (Payal Jangid Goalkeepers19) करण्यात आला. राजस्थानातील बालमजुरी आणि बालविवाहासारख्या अनिष्ट परंपरा रोखण्यात पायलचा मोलाचा वाटा आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबरीने ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’मध्ये सन्मानित झाल्याचा अतीव आनंद आहे. ज्या पद्धतीने मी माझ्या गावात बालमजुरी आणि बालविवाहासारखे प्रकार थांबले, तसंच मी जागतिक पातळीवरही काही काम करु इच्छिते’ अशा भावना पायलने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर व्यक्त केल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपसचिव अमिना मोहम्मद यांच्या हस्ते पायलला गौरवण्यात आलं.

कोण आहे पायल जांगिड?

राजस्थानमधील हिंसला नावाच्या एका छोट्याशा खेडेगावातील पायल जांगिड (Payal Jangid Goalkeepers19) ही तरुणी. लहान मुलांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देणारा समुदाय तिच्या अवतीभवती होता. मात्र पायलने फक्त स्वतःचंच आयुष्य घडवलं नाही, तर तिच्या आजूबाजूच्या चिमुरड्यांच्या आयुष्यालाही नवी दिशा दिली.

राजस्थानातील ग्रामीण भागांमध्ये बालविवाह आणि बालमजुरी नवीन नाही. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून मुलांना कामाला जुंपलं जातं. साहजिकच त्याचा परिणाम शिक्षणावर होतो. शिक्षण नाही, त्यामुळे हाताला काम नाही. काम नाही, तर पैसा नाही, असं हे दुष्टचक्र.

हिंसलामधील बाल मित्र ग्राम

हिंसला गावात ‘बचपन बचाओ आंदोलन’ या संस्थेने ‘बाल मित्र ग्राम’ ही अभिनव योजना सुरु केली. हे असं गाव आहे, जे बालमजुरीचं निर्मूलन करतं आणि शाळेत या मुलांचे प्रवेश निश्चित होतील, याची तजवीज करतं. या संकल्पनेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खुद्द मुलांचा सहभाग. ज्यामुळे ही मुलं आणि उर्वरित समुदायाच्या दरम्यान एक दुवा तयार करण्यात मदत होते.

यामागची कल्पना म्हणजे ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या सहभागाने आणि गुंतवणूकीद्वारे मुलांच्या हक्कांचं संरक्षण सुनिश्चित करणं. या मॉडेलचा एक भाग म्हणून, बाल पंचायत (लहान मुलांची परिषद) देखील तयार केली गेली आणि पायल या बाल पंचायतीच्या प्रधान (मुख्य) पदावर निवडून आली.

पायलने तिच्या गावातील मुलं आणि स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी बरेच उपक्रम राबवले. पायलने बालविवाह आणि ‘घुंगट प्रथे’विरोधात लढा दिला. या परंपरेनुसार महिलांना सतत आपलं तोंड पदराआड झाकण्याची सक्ती असते. तिच्या प्रयत्नांना एका वर्षाच्या आतच दृश्यमान परिणाम मिळू लागले. अखेरीस, हिंसला गावामधून बालविवाह पूर्णपणे थांबले. पायलसाठी हा एक मोठा विजय होता.

2013 मध्ये स्वीडनच्या प्रतिनिधीमंडळाने पायलच्या कामाचा आढावा घेतला आणि ते तिच्या कामावर इतके प्रभावित झाले की त्यांनी पायलला ‘वर्ल्ड्स चिल्ड्रन्स प्राईज’साठी ज्युरी सदस्य म्हणून नियुक्त केलं.

एकट्या भारतातच पाच ते 14 वयोगटातील 49 लाख बालमजूर आहेत. या सर्वांमध्ये, पायलची प्रेरणादायी कहाणी या अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्याच्या आशा जिवंत ठेवते.

नरेंद्र मोदींचा सन्मान

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊण्डेशनतर्फे ‘गोलकीपर्स ग्लोबल गोल्स अवॉर्ड’ दिले जातात. ‘स्वच्छ भारत अभियाना’ला सुरुवात करुन भारतात नवा पायंडा घातल्याबद्दल मोदींना बिल गेट्स यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून कोट्यवधी भारतीयांचा आहे. फक्त स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय न ठेवता, अनेक भारतीयांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात स्वच्छता अंगिकारली आहे.’ असं मोदी यावेळी म्हणाले. ‘महात्मा गांधींनी कधीच आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्यांचं आयुष्यच प्रेरणेचा स्त्रोत होतं. आपण इतरांवर छाप पाडण्याचा प्रयत्न या युगात करतो, मात्र गांधीजींनी आपण कसं प्रेरणादायी ठरावं, हे शिकवलं’ असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *