India-Russia Friendship : रशियाचा अपेक्षाभंग, भारताने पुतिन यांना दिला मोठा धक्का, महत्वाची माहिती समोर
India-Russia Friendship : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. या दौऱ्याची समीक्षा केल्यास रशियाला एका आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अपेक्षाभंग झालाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण मैत्री जरी असली, तरी त्यासोबत व्यापारी उद्दिष्टय सुद्धा असतात.

मागच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले होते. त्यांच्या या दौऱ्याचा मीडियामधून बराच गाजावाजा झाला. रशिया हा भारताचा सर्वात जुना मित्र आहे. अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चुकीच्या टॅरिफ धोरणामुळे भारत आणि रशियाची मैत्री अधिक घनिष्ट बनली. आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन देशांमध्ये कितीही चांगली मैत्री असली, तरी व्यापाराची सुद्धा एक महत्वाची बाजू असते. रशिया आणि भारताच्या व्यापाराबाबत बोलायचं झाल्यास त्यात असंतुलन मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे भारत रशियाकडून आयात सर्वात जास्त करतो, त्या तुलनेत भारताची निर्यात कमी आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे रशिया संकटात आहे. अशावेळी भारत त्यांच्याकडून तेल खरेदी करुन रशियन अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यात मदत करतोय. पण तुलनेने भारताला रशियाकडून मिळणारं उत्पन्न कमी आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या ताज्या दौऱ्यात हेच व्यापारी संतुलन कमी करण्याचा भारताने प्रयत्न केला. रशिया 60 च्या दशकापासून भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश राहिला आहे. भारताने आतापर्यंत रशियाकडून अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र विकत घेतली आहेत. या रशियन शस्त्रांनी युद्धकाळात आपली उपयुक्तता सुद्धा सिद्ध केली. S-400 एअर डिफेन्स सिस्टिम हे त्याचं उत्तम उदहारण आहे. भारताकडे रशियन बनावटीची सुखोई-एमकेआय 30, मिग विमानं तसच रणगाडे आहेत. या शस्त्रास्त्र व्यवहाराच्या बदल्यात रशिया भारताकडून अब्जावधी डॉलर्स वसूल करतो.
ऐकून घेतलं, पण कुठलं आश्वासन दिलं नाही
आता पुतिन यांच्या दौऱ्यात रशियाचा तोच प्रयत्न होता. रशियाने भारतासमोर संरक्षण सहकार्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव ठेवला. यात पाचव्यापिढीचं SU-57 स्टेल्थ फायटर, लांब पल्ल्याचे ड्रोन्स आणि पाणबुडी विक्रीचा प्रस्ताव रशियाने दिला. पण भारताने रशियाच्या या प्रस्तावांमध्ये फारसा उत्साह दाखवला नाही. रशियन अधिकाऱ्यांचं ऐकून घेतलं. पण कुठलं आश्वासन दिलं नाही. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने ‘द हिंदू’ने वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे.
पुतिन यांच्यासह रशियासाठी मोठा धक्का
भारताने आपलं संपूर्ण लक्ष स्वेदशी निर्मितीवर दिलं आहे. डिफेन्समध्ये आत्मनिर्भरता भारताचं उद्दिष्टय आहे. त्यामुळेच भारताने रशियाच्या ऑफरमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. हा पुतिन यांच्यासह रशियासाठी मोठा धक्का आहे. कारण त्यांचं जे व्यापारी उद्दिष्टय होतं, ते साध्य होऊ शकलं नाही. उलट भारताने व्यापारी वस्तुंची निर्यात वाढवण्यासाठी करार केले, जेणेकरुन रशियासोबतच व्यापारातील असंतुलन कमी होईल.
