ब्रेड आणायला गेली आणि फेमस झाली, एका फोटोने बदललं चिमुकलीचं आयुष्य…
दक्षिण आफ्रिकेतील एका चार वर्षांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोने तिचं अख्ख आयुष्यंच बदलून गेलंय. ब्रेडचं पाकीट हातात धरून उभ्या असलेल्या तिच्या निरागस हास्याने सर्वांची मने जिंकली आणि...
एक फोटो हा हजारो शब्दांचा बरोबरीचा असतो… असं म्हणतात. त्याचप्रमाणे आजच्या काळात एक व्हिडीओ किंवा फोटो एखाद्याचं संपूर्ण आयुष्यचं बदलून टाकू शकतो. तो बदल वाईट असू शकतो किंवा चांगलाही असू शकतो. मात्र आता सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात एक व्हिडीओ शेअर होताच लोकांना मोठ-मोठया ऑफर्स मिळतात. बॉलिवूडमध्ये गाण्याने धूमधडाका करणारी रानू मंडल हे त्याचं उदाहरण. हे तर झालं व्हिडीओबद्दल, पण एका फोटो मुळे, फक्त एका फोटोमुळे एका लहान मुलीचं संपूर्ण आयुष्य बदललं, तुमचा यावर विश्वास बसेल का ?
खरंतर सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा व्हिडीओ व्हायर झाला आणि तिच्या हास्याने सर्वांना भुरळ पडली. या मुलीचं सुंदर हास्य, तिचं निरागस हास्य पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य फुलेल. ही मुलगी दक्षिण आफ्रिकेतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांच्या मुलीला वडील नाहीत. तिची आई एकटीच तिचे पालनपोषण करते. पण आता देशभरात त्या मुलीची चर्चा होत आहे. एवढंच नव्हे तर हा फोटो जगभरातही व्हायरल झाला आहे. तिचं हास्य पाहून सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की नक्की असं काय आहे की ती इतकी व्हायरल झाली, नक्की काय मामला आहे?, असा प्रश्न सर्वांना पडलाय. खरं तर हातात ब्रेडचं पाकीट धरून उभी असलेली ही मुलगी आता त्याच ‘अल्बानी’ ब्रेड कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे, अशी चर्चा आहे.
चार वर्षांची चिमुरडी बनली ब्रँड ॲम्बेसेडर ?
ऐकून खरं वाटत नाही ना, पण हेच सत्य आहे. अवघ्या 4 वर्षांची ही चिमुकली एका कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे. खरं तर झालं असं की, त्या मुलीच्या आईने तिला ब्रेड विकत आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं. परत येत असताना एका फोटोग्राफरची नजर या मुलीवर पडली. हातात ब्रेड आणि चेहऱ्यावर निरागस हास्य, तिचा असा चेहरा पाहून तो फोटोग्राफरही लुब्ध झाला. तिची निरागसता पाहून तोही सुखावला आणि त्याने लागलीच त्याच्या कॅमेऱ्याचा सुयोग्य वापर करत त्या मुलीचा फोटो क्लिक केला.
मग काय बघता- बघता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. असं म्हणतात की अनेक लोकांनी त्या ब्रेड कंपनीला पत्र लिहून त्या चिमुकल्या मुलीला कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याची मागणी केली. लोकांचं प्रेम आणि मुलीची निरागसता पाहून त्या कंपनीनेही त्या मुलीला ब्रँड ॲम्बेसेडर बनवलं अशी चर्चा आहे.
मात्र अल्बनीशी या कंपनीची कोणताही करार झाला नसल्याची कबुली हा फोटो काढणाऱ्या लुंगीसानी मजजी यांनी दिली आहे. मला किंवा मुलीला या फोटोच्या बदल्यात कंपनीकडून काहीच देण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.