ट्रम्प-पुतिन भेटीआधी युक्रेनचा मोठा हल्ला, थेट जहाज उडवलं; युद्धाचा भडका उडणार?
रशियाला कोंडित पकडण्यासाठी तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयातशुल्क लावलेला आहे. या भेटीनंतर या आयातशुल्कात कपात होण्याची आशा भारताला आहे. त्यामुळे भारताचेही या बैठकीकडे विशेष लक्ष आहे. या बैठकीत युद्ध थांबवण्यावर चर्चा केली जाणार आहे. असे असतानाच बैठकीच्या काही तास अगोदरच युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला आहे.

Donald Trump And Vladimir Putin Meeting : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक होणार आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी या बलशाली राष्ट्रांच्या सर्वोच्च नेत्यांत चर्चा होणार आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगाचे या भेटीकडे लक्ष लागलेले आहे. रशियाला कोंडित पकडण्यासाठी तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयातशुल्क लावलेला आहे. या भेटीनंतर या आयातशुल्कात कपात होण्याची आशा भारताला आहे. त्यामुळे भारताचेही या बैठकीकडे विशेष लक्ष आहे. या बैठकीत युद्ध थांबवण्यावर चर्चा केली जाणार आहे. असे असतानाच बैठकीच्या काही तास अगोदरच युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला आहे.
युक्रेनने रशियाच्या जहाजांना केलं लक्ष्य
मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनकडून रशियावर हल्ले केले जात आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्याआधीच युक्रेनने पुन्हा एकदा रशियावर हल्ले चालू केले आहेत. आता ताज्या हल्ल्यांत युक्रेनने रशियाच्या अस्त्राखान भागात ओल्या या बंदराला लक्ष्य केले आहे. युक्रेनच्या सैन्याने इराणने दिलेले ड्रोन तसेच दारूगोळा वाहून नेणाऱ्या जहाजावर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे युक्रेनच्या सैन्याच्या जनरल स्टाफने या हल्ल्याला दुजोरा दिलेला आहे.
तेल रिफायनरीवरही युक्रेनचा हल्ला
या हल्ल्यानंतर युक्रेनने रशियाच्या समारा ओब्लास्ट येथील सिजरान तेल रिफायनरीलाही लक्ष्य केले आहे. हे हल्ले कथितरित्या युक्रेनच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेसद्वारे संरक्षण विभागाच्या अन्य शाखांच्या मदतीने पार पाडण्यात आले.
हल्ल्यानंतर पुतिन काय भूमिका घेणार?
दरम्यान, अलास्कातील ही भेट होण्याअगोदरल ट्रम्प यांनी पुतिन यांना महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. युद्धबंदीवर सकारात्मक चर्चा न झाल्यास रशियाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ट्रम्प यांनी म्हटलेले आहे. असे असतानाच पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीच्या अगोदरच युक्रेनने हल्ला केल्यामुळे आता रशिया नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हे हल्ले करून युक्रेनला काय साध्य करायचे आहे? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
