अमेरिकेनं पुन्हा जगाचं टेन्शन वाढवलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक निर्णय, रिपोर्टने लिक होताच अनेक देशांची झोप उडाली
जगात सध्या युद्धाचं वातावरण आहे, यातच आता अमेरिकेनं असा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. चीनसोबत सुरू असलेला संघर्ष या निर्णयाच्या पाठीमागे असल्याचं बोललं जात आहे.

सध्या जगभरात युद्धाचं वातावरण आहे, युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरू आहे, दुसरीकडे इस्रायल आणि गाझामध्ये देखील 2023 पासून युद्ध सुरू आहे, चीन आणि तैवानमध्ये देखील लवकरच युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, काही दिवसांपूर्वीच इस्रायल आणि इराणमध्ये देखील भीषण युद्ध झालं. दरम्यान सध्या जगभरात सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती असतानाच आता खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवासंपासून सातत्यानं अमेरिकेकडं शस्त्रास्त्रांची कमी असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान त्यानंतर आता एक रिपोर्ट समोर आला आहे, या रिपोर्टनं खळबळ उडाली आहे. अमेरिकन वृत्तपत्र असलेल्या वॉल स्ट्रीट जर्नलचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पेंटागॉनकडून अमेरिकेतल्या मिसाईलचं उत्पादन हे चार पटीनं वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चीनसोबत संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेंटागॉनकडून हे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या अनेक कारणांमुळे संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचं रूपांतर भविष्यात युद्धात होऊ शकतं. याच कारणामुळे आता अमेरिकेनं आपल्या मिसाईलचं उत्पादन चार पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शस्त्रांना मार्केटमध्ये मागणी आहे, अशा शस्त्रांचं उत्पादन देखील अमेरिकेनं वाढवलं आहे, असा दावा देखील अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्यानं या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून सुरू करण्यात आलेल्या या मिशनची जबाबदारी अमेरिकेचे उपरक्षा सचिव स्टीव फीनबर्ग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दर आठवड्याला काही कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत अमेरिकेच्या उपरक्षा सचिवांची बैठक सुरू असल्याचा दावा देखील या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी जुलै महिन्यात आपल्याकडे सध्या शस्त्रांचा साठा कमी असल्याचं कारण सांगून अमेरिकेनं युक्रेनला सुरू असलेल्या शस्त्रांचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आता अमेरिकेनं आपल्या मिसाईलचं उत्पादन चार पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी चीनसोबत सुरू असलेला सुप्त संघर्ष देखील कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
