डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सोपवली मोठी जबाबदारी, खास उपक्रमासाठी अमेरिकेकडून PM मोदींना आमंत्रण
Gaza Board of Peace : अमेरिकेकडून गाझा शांती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात सामील होण्यासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण आले आहे.

काही महिन्यांपूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष पहायला मिळाला होता. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझा पट्टीत हाहाकार माजला होता. कालांतराने अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीनंतर हल्ले थांबले होते. त्यानंतर आता हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून गाझा शांती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळात सामील होण्यासाठी अमेरिकेने भारताला आमंत्रित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण आले आहे. हे मंडळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल-हमास युद्ध पूर्णपणे संपवण्याच्या योजनेचा दुसरा टप्पा आहे. यात आता भारतावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गाझा शांती मंडळात सामील होण्यासाठी भारताला आमंत्रण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांती मंडळाच्या दुसऱ्या टप्प्याची स्थापना करण्याची गुरुवारी घोषणा केली होती. हे युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे मंडळ गाझाच्या दैनंदिन व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक तांत्रिक समितीचे निरीक्षण करेल आणि युद्धबंदी चौकटीचा भाग असणार आहे. या मंडळाचे उद्दिष्ट गाझा प्रदेशात स्थिरता आणणे आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी धोरण विकसित करणे हे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या योजनेत गाझा पुन्हा राहण्यायोग्य बनवण्यासाठी आवश्यक निधी उभारण्याच्या मुद्द्याचाही समावेश आहे. यामुळे या प्रदेशाचा विकासाला चालना मिळणार आहे.
1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा निधी द्यावा लागणार
भारतासह अमेरिकेने या मंडळात सामील होण्यासाठी आणखी चार देशांनाही आमंत्रित केले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या देशाला या मंडळाचे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवायचे असेल तर 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा निधी द्यावा लागेल. तसेत जर एखाद्या देशाला तीन वर्षांचे सदस्यत्व हवे असेल तर कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देण्याची आवश्यकता नाही.
जागतिक स्तरावर भारताची ताकद वाढली
गाझातील शांततेसाठी अमेरिकेने निमंत्रण दिल्याने जागतिक स्तरावर भारताची वाढती भूमिका आणि त्याचा महत्त्वपूर्ण भू-राजकीय प्रभाव प्रतिबिंबित करते. यामुळे सध्या जगात सुरू असलेल्या संघर्षांमध्ये स्थिरता आणि सलोखा प्रक्रियेत भारताचे सक्रिय भागीदार म्हणून स्थान निर्माण होत आहे. ट्रम्प यांचा पुढाकार हा गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न आहे. यात भारतासारख्या देशांना सामाविष्ट करण्यात येत आहे हा एक भारताच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
