मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत : डोनाल्ड ट्रम्प

मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 4 एप्रिलनंतर काहीच बोलणं झालं नाही, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली आहे (Donald Trump says Narendra Modi not in Good Mood over conflict with China)

मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत : डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क : भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर मध्यस्थी करण्याच्या आपल्या प्रस्तावाचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी बोललो. चीनसोबतच्या संघर्षामुळे ते सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत” अशी टिप्पणी ट्रम्प यांनी केली. परंतु गेल्या दोन महिन्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात कुठलाही संवाद झालेला नाही असं सरकारमधील सूत्रांचं म्हणणं आहे. (Donald Trump says Narendra Modi not in Good Mood over conflict with China)

भारत आणि चीन यांच्यात सध्या ‘मोठा संघर्ष’ सुरु आहे, असं ट्रम्प गुरुवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

“भारतात मला पसंत केलं जातं. मला वाटतं, की आपल्या देशात (अमेरिका) मीडियाला मी जितका आवडत नाही, तितका मी भारताला आवडतो. आणि मला मोदी आवडतात. मला तुमचे पंतप्रधान खूप आवडतात. ते उत्तम गृहस्थ आहेत” असं ट्रम्प म्हणाले.

भारत आणि चीन यांच्या सीमेवरील परिस्थितीबद्दल चिंता वाटते का, असा प्रश्न विचारला असता, “भारत आणि चीन… त्यांचा मोठा संघर्ष आहे… प्रत्येकी 1.4 अब्ज लोकसंख्या असलेले दोन देश. अतिशय शक्तिशाली सैन्यदल. भारत खुश नाही आणि बहुधा चीन समाधानी नाही” असे ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा : चीन आणि आम्ही बघून घेऊ, मध्यस्थाची गरज नाही, भारताचं ट्रम्प यांना उत्तर

“मी तुम्हाला सांगू शकतो; मी पंतप्रधान मोदींसोबत बोललो. चीनसोबत जो वाद सुरु आहे, त्यावरुन ते चांगल्या मूडमध्ये नाहीत” असा दावा ट्रम्प यांनी केला.

दरम्यान, मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 4 एप्रिलनंतर काहीच बोलणं झालं नाही, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिल्याचं ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाबाबत दोघांमध्ये शेवटची चर्चा झाली होती, अशी माहिती आहे.

(Donald Trump says Narendra Modi not in Good Mood over conflict with China)

भारत-चीनमधील सीमा वादावर मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी दाखवली होती. “आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना याबाबत कळवले आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तर अमेरिका मध्यस्थीसाठी तयार आहे.” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत म्हटले होते. परंतु भारत आणि चीन शांततापूर्ण मार्गाने या मुद्द्यावर उत्तर शोधेल. आम्ही चीनशी चर्चा करत आहोत, अशी भूमिका भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची तयारी दर्शवली होती. तेव्हाही भारताने काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत यात मध्यस्थाची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

चीनसोबतचा वाद काय?

चीनने भारत-चीन सीमेवर असलेल्या गालवान नदीजवळ आपल्या सैनिकांची वाहतूक आणि सामानाचा पुरवठा यासाठी अनेक रस्ते बनवले आहेत. हेच पाहून भारताच्या सीमा रस्ते विभागाने देखील त्या भागात रस्ते निर्मितीला वेग दिला. यानंतर चीन बिथरल्याचं पाहायला मिळालं. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाखमध्ये चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. चीनकडून सीमारेषेवर सातत्याने सैनिकांच्या संख्येत वाढ केली जात आहे. 6-7 मे रोजी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये वादही झाला. यानंतरच पूर्व लडाख सीमेवर सातत्याने तणाव निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

डोनाल्ड ट्रम्प भारत-चीन सीमावादात मध्यस्थीसाठी इच्छुक

नकाशा वादात नेपाळची माघार, भारताच्या क्षेत्राला नकाशात दाखवण्याचा प्रस्ताव नेपाळकडून मागे

(Donald Trump says Narendra Modi not in Good Mood over conflict with China)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *