‘जयभीम’ चा जयघोष प्रथम कुठे झाला ? घ्या जाणून
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या मक्रणपूर गावात 1938 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक ऐतिहासिक सभा झाली. आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे भाऊसाहेब मोरे यांनी सभा संपल्यानंतर जयभीम, असा जयघोष केला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘समाजाने इतिहासाचा विसर पडू द्यायचा नसतो. जे लोक इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.’ आज 6 डिसेंबर आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया की, ‘जयभीम’ या दोन शब्दांचा उगम कसा झाला? चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने वाचा.
जयभीमचा नारा जिथे सर्वात आधी घुमला, त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात मक्रणपूर गावात 1938 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा एक ऐतिहासिक सभा झाली. तिथेच त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे भाऊसाहेब मोरे यांनी सभा संपल्यानंतर जयभीम असा नारा दिला. यापुढे दलित बांधवांनी एकमेकांना भेटल्यावर याच शब्दाने अभिवादन करायचे, असे ठरले.
अवघ्या सभेनेही एकमताने याला दुजोरा दिला. त्या दिवशी साऱ्या आसमंतात जयभीमचा जयघोष झाला… आणि पाहता पाहता जयभीम हा शब्द भारतातील जातीयवाद नष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची ओळख बनला. दलित ऐक्याचं प्रतीक बनला.
सभेतील ठराव कोणते?
नमस्कार ऐवजी‘जयभीम’ नावाचा जयघोष करणे.
निजामाचान व मुस्लिम बनविण्याच्या धोरणाचा निषेध
मेलेल्या जनावरांचे मास खाण्याची प्रथा बंदचे आवाहन
स्वाभिमानाचे जीवन जगावे असे अमूल्य मार्गदर्शन.
जुलमी निजाम दलितांचे शोषण करीत असल्याचे पटवले
दलितांना धार्मिक, राजकीय हक्कांपासून दूर ठेवल्याची जाणीव करून दिली.
सभा घेण्यास ऐनवेळी बंदी
1938 चा तो काळ मराठवाड्यातील भाऊसाहेब मोरे अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांची भेट घेतली व त्यांना कन्नड येथे दलितांच्या परिषदेसाठी येण्याचे आमंत्रण दिले. डॉ. बाबासाहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले. त्यांनी दिलेल्या तारखेनुसार 30 डिसेंबर 1938 रोजी कन्नड येथे दलितांची परिषद घ्यायचे ठरले. परंतु त्या काळात निझाम सरकार डॉ. बाबासाहेबांच्या विरुद्ध होते. त्यांनी बाबासाहेबांना मराठवाड्यात सभ घेण्यास मज्जाव केला. त्यांच्या सभेवर बंदी झाली.
मराठवाड्यातली अत्यंत महत्त्वाची परिषद कोणत्याही स्थितीत पार पाडायचीच, असा निग्रह भाऊसाहेब मोरे, श्यामराव जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी केला. त्यांनी ही दलित परिषद ब्रिटिश आमदनीतील चाळीसगाव तालुक्यातील कन्नडच्या सीमेवर असलेल्या मक्रणपूर (डांगरा) या गावी आयोजित केली. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या उपस्थितीत मक्रणपूर येथे दलित बांधवांची मोठी परिषद संपन्न झाली.
मक्रणपूरची 1938 साली ऐनवेळी ठरलेली सभादेखील अशीच ऐतिहासिक ठरली. या सभेनंतर मक्रणपूरचे भाग्य तर उजळलेच. पण त्या आधी म्हणजे 29 डिसेंबर 1938 रोजीही आणखी एका महान व्यक्तीचे इथे चरणस्पर्श झाले. असं म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच संत गाडगेबाबा या गावात येऊन गेले होते.
मक्रणपूरमध्ये 30 डिसेंबरला धम्म परिषदेचे आयोजन करतात मराठवाड्यातील भाऊसाहेब मोरे यांचे कुटुंबीय आजही मक्रणपूरमधील त्या व्यासपीठाचे स्मरण ठेवत 30 डिसेंबर रोजी मक्रणपूर गावात धम्म परिषदेचे आयोजन करतात.
