‘लंगडा’ आंबा… नाव ऐकून हसू येतं? मग त्यामागचं खरं कारण वाचा!
‘लंगडा’ आंबा… नाव ऐकून अनेकांना हसू येतं, पण या प्रसिद्ध आंब्याच्या नावामागे एक रंजक आणि ऐतिहासिक किस्सा दडलेला आहे. उत्तरेत खूप लोकप्रिय असलेल्या या आंब्याची चव जितकी अप्रतिम, तितकंच त्याचं नावही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करतं.

उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा सीजन असतो. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो – आज कोणता आंबा खाऊ? कोणाला हापूस आवडतो, कोणाला केशरची भुरळ पडते, तर कोणाला लंगडा आंब्याचा चस्का लागतो. लंगडा आंबा हा उत्तर भारतातला सर्वात प्रसिद्ध आंबा. मधापेक्षा गोड, रसाळ आणि एकदा खाल्ला की मन तृप्त करणारा. पण असा हा स्वादिष्ट आंबा लंगडा कसा काय झाला? लंगडा तर तो दिसत नाही, मग त्याचं नाव लंगडा का पडलं? यामागची कहाणी रोचक आहे.
लंगडा आंब्याची खासियत
लंगडा आंब्याची खासियत म्हणजे त्याचा गोडवा आणि रसाळपणा. हा आंबा लंबगोल असतो, खालच्या बाजूने थोडा निमुळता. पिकला तरी त्याचा रंग हिरवाच राहतो, पण आतला गर हलका पिवळा आणि खूप मऊ असतो. याची गुठळी पातळ आणि रुंद असते. एकदा हा आंबा खाल्लात, तर त्याचा स्वाद तोंडातून जात नाही. यामुळे उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये याची खूप मागणी आहे. बांगलादेशातही हा आंबा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो.
भारतातून दरवर्षी लाखो टन लंगडा आंबे परदेशात जातात. जगभरातल्या 40 हून अधिक देशांमध्ये हा आंबा पोहोचतो. बनारसच्या लंगडा आंब्याला GI टॅगही मिळालाय, म्हणजे याची खास ओळख आणि दर्जा जगाने मान्य केला आहे. याचा स्वाद इतका अप्रतिम आहे, की परदेशातही लोक याचे चाहते आहेत.
बनारसशी खास नातं
लंगडा आंब्याचं बनारसशी खास नातं आहे. बनारस म्हटलं, की डोळ्यांसमोर येतात गंगा घाट, साड्या, पान आणि लंगडा आंबा. या शहराने लंगडा आंब्याला नाव आणि प्रसिद्धी दिली. असं सांगितलं जातं, की बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरात सावन महिन्यात लंगडा आंब्याचा भोग लावला जातो. ही परंपरा अहिल्याबाई होल्करांच्या काळापासून सुरू आहे.
लंगडा आंब्याची कहाणी बनारसच्या मातीत रुजली आहे. हा आंबा फक्त स्वादच देत नाही, तर एका साधूच्या भक्तीची आणि पुजाऱ्याच्या मेहनतीची आठवण करतो. आजही बनारसच्या बाजारात लंगडा आंब्याची मागणी कायम आहे.
लंगडा आंबा नावामागचा खरा इतिहास काय?
ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातल्या बनारस शहराची, ज्याला काशी म्हणूनही ओळखतात. तिथं एक प्राचीन शिवमंदिर होतं. या मंदिरात एक पुजारी सेवा करायचे. त्यांचा एक पाय नव्हता, म्हणून आजूबाजूचे लोक त्यांना ‘लंगडा पुजारी’ म्हणायचे. हे पुजारी खूप भक्तीभावाने मंदिराची काळजी घ्यायचे. एके दिवशी मंदिरात एक साधू आले. त्यांनी मंदिराच्या अंगणात दोन आंब्याची झाडं लावली. साधूंनी पुजाऱ्यांना सांगितलं, “ही झाडं सांभाळा, पण याचे आंबे कोणालाही देऊ नका. पहिलं फळ भगवान शिवाला अर्पण करा.”
पुजाऱ्यांनी साधूंच्या सांगण्याप्रमाणे झाडांची काळजी घेतली. काही वर्षांनी त्या झाडांना फळं लागली. ती फळं इतकी गोड आणि रसाळ होती, की पुजाऱ्यांना स्वतःला चाखावंसं वाटलं. त्यांनी काही आंबे चाखले आणि काही काशीच्या राजाला भेट म्हणून पाठवले. साधूंनी आंबे कोणालाही न देण्याचा आदेश दिला होता, पण पुजाऱ्यांनी राजाला आंबे दिले. राजाला ते इतके आवडले, की त्यांनी आपल्या बागेतही ती झाडं लावली. हळूहळू हा आंबा बनारसच्या गल्लीबोळांतून बाहेर पडला आणि सर्वत्र पसरला. म्हणून लोकांनी या आंब्याचं नाव ठेवलं लंगडा का?
लंगडा आंबा कसा ओळखाल?
लंगडा आंबा खरेदी करताना त्याची खास वैशिष्ट्यं लक्षात ठेवा. याचा आकार लंबगोल आणि खालून निमुळता असतो. रंग हिरवा असतो, पण पिकल्यावरही तो पूर्ण पिवळा होत नाही. गुठळी पातळ आणि गर रसाळ असतो. बाजारात काही वेळा रसायनांनी पिकवलेले आंबे विकले जातात. खरा लंगडा आंबा ओळखण्यासाठी त्याला पाण्याच्या बादलीत टाका. तो बुडाला तर तो नैसर्गिक आहे. जर तो तरंगला तर रसायनांनी पिकवलेला आहे, असा खाऊ नका.
