औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ रुळांवर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. (Aurangabad Train Mishap Kills Labors)

औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली. (Aurangabad Train Mishap Kills Labors)

लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली.

पहाटे 5.15 वाजताच्या सुमारास आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने दिलेल्या धडकेत 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

जालन्यातील स्टील कंपनीत हे मजूर काम करत होते. हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते भुसावळच्या दिशेने पायी निघाले होते, मात्र रात्री थकून त्यांनी रेल्वे रुळावरच झोप घेतली. सर्वांची नावे, पत्ते यांची पडताळणी करुन यादी केली जात आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.

रेल्वे रुळापासून काही अंतरावर असलेले चार मजूर थोडक्यात बचावले. या मजुरांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचं समुपदेशन करुन त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली जाईल, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

हेही वाचा  : परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.


भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.

पहा व्हिडिओ:

(Aurangabad Train Mishap Kills Labors)

Published On - 7:58 am, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI