“राहुल गांधी  पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद”

सोलापूर : बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असे लिहिलेल्या पाट्या पाहायला मिळतात. मात्र, सोलापुरातील माढा शहरात एका सलुन व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क राहुल गांधींचे अस्त्र वापरले आहे. सचिन बाळासाहेब शेलार असे त्या नामी शक्कल लढवलेल्या सलुन व्यावसायिकाचे नाव आहे. उधारीला कंटाळलेल्या सचिन शेलारने थेट ‘राहुल गांधी  पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’ अशीच पाटी […]

“राहुल गांधी  पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद”
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 05, 2019 | 3:38 PM

सोलापूर : बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असे लिहिलेल्या पाट्या पाहायला मिळतात. मात्र, सोलापुरातील माढा शहरात एका सलुन व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क राहुल गांधींचे अस्त्र वापरले आहे. सचिन बाळासाहेब शेलार असे त्या नामी शक्कल लढवलेल्या सलुन व्यावसायिकाचे नाव आहे. उधारीला कंटाळलेल्या सचिन शेलारने थेट ‘राहुल गांधी  पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’ अशीच पाटी लावली आहे.

सचिन शेलार यांनी आपल्या दुकानातील काचेवर राहुल गांधी यांचा फोटोही लावला आहे. हा फोटो त्यांनी राहुल गांधींचे समर्थक असल्यामुळे लावला नसून दुकानात उधारी होऊ नये म्हणून लावला. त्यामुळे त्यांच्या या दुकानातील पाटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. नोटबंदीनंतर त्याच्या वस्ताऱ्याची धारही काहीशी बोथट झाली आणि त्याच्या उत्पन्नाला फटका बसला. त्या कालावधीत उधारीचे प्रमाण वाढले होते. अखेर उधारीला कंटाळलेल्या सचिन शेलार यांनी या फलकाची शक्कल लढवली. हा फलक लावण्यामागे राहुल गांधींना तुच्छ लेखण्याचा किंवा त्यांची टर उडवण्याचा उद्देश नसल्याचे सचिन शेलार यांनी सांगितले आहे. आज रोख उद्या उधार  असा फलक लिहिण्यापेक्षा मी हा वेगळा फलक लिहून उधारीवर काम करण्याची मागणी करणाऱ्या ग्राहकांना त्यांना भविष्यात उधारीवर काम करुन मिळेल अशी आशा दाखवली आहे, असेही शेलार सांगतात.

दरम्यान, नुकतेच बिकानेरमध्ये एका मिठाई विक्रेत्याने राहुल गांधींचा फोटो लावून उधारी बंद असल्याचा फलक लावल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामागील सत्य तपासले असता तो फोटो फेक असल्याचेही उघड झाले होते. माढ्यातील या सलुन व्यावसायिकांने लावलेला हा फलक मात्र, खराखुरा आहे. सचिनच्या  या हटके प्रयोगाचा चांगलाच फायदा होत असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले.

यापूर्वी  सांगलीच्या सलुन व्यावसायिकांने सोन्याचा वस्तारा केल्याने तो राज्यभरात गाजला  होता. त्यानंतर आता माढ्यातील शेलार यांनी उधारीच्या कटकटीला कंटाळून राहुल गांधींचे अस्त्र वापरल्याने त्यांची आणि त्यांच्या दुकानाची बरीच चर्चा होत आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें