आस्तिककुमारांच्या बदलीनंतर रिक्त पद अखेर भरलं, बीडला दीड महिन्यांनी नवे जिल्हाधिकारी

दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बीडच्या जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावर यांची वर्णी लागली.

आस्तिककुमारांच्या बदलीनंतर रिक्त पद अखेर भरलं, बीडला दीड महिन्यांनी नवे जिल्हाधिकारी

बीड : आस्तिक कुमार पांडेय यांच्या बदलीनंतर रिक्त झालेलं बीड जिल्हाधिकाऱ्यांचं पद अखेर भरण्यात आलं आहे. राहुल रेखावर यांच्या रुपाने बीडला तब्बल दीड महिन्यांनी नवे जिल्हाधिकारी (Beed Gets New Collector) मिळाले आहेत.

राहुल रेखावर यांनी आज (11 फेब्रुवारी) बीड जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या बदलीनंतर तब्बल दीड महिने प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांनी कामकाज पाहिलं होतं.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांमुळे नागरिकांची अनेक कामं खोळंबली होती. अखेर दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारीपदी राहुल रेखावर यांची वर्णी लागली. पहिल्या दिवशीच विविध विषयांचा आढावा घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याला लवकरच नवीन जिल्हाधिकारी मिळेल, असं आश्वस्त केलं होतं. मुंडेंनी आपलं आश्वासन पाळल्याचं दिसत आहे.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आस्तिक कुमार पांडेय यांनी डिसेंबर महिन्यात औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. आस्तिक कुमार पांडेय यांनी आपल्या कामाकाजाची सुरुवात अगदी दणक्यात केली होती.

पांडेय यांना स्वागताचा पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्यालाच त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. प्लास्टिक बंदी असताना, प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ आणल्यामुळे आस्तिक कुमार पांडेय यांनी पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगा उगारला होता.

स्वत:लाच दंड ठोठावणारा जिल्हाधिकारी

आस्तिक कुमार पांडेय यांनी यापूर्वी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना, चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा वापर केल्याने त्यांनी स्वत:वरच कारवाई केली.

बीडमध्ये निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला होता. काही पत्रकारांनी प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्यास नकार दिला. प्लास्टिकवर बंदी असताना अशा कपांमध्ये चहा का दिला जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.

पांडेय यांनी सर्व पत्रकारांसमोर स्वत:ला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने स्वत:ला दंड ठोठावण्याचं हे कदाचित पहिलंच प्रकरण असेल.

Beed Gets New Collector

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI