ब्लॉग : ‘ना अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो का बच्चा, ये है सीधे साधे अक्षय..अक्षय…’

ब्लॉग : 'ना अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो का बच्चा, ये है सीधे साधे अक्षय..अक्षय...'

बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार रिल लाईफमधील या गाण्याप्रमाणेच रिअल लाईफमध्ये सीधा-साधाचं आहे. अक्षयशी पहिल्यांदाच भेटण्याचा (Actor Akshay Kumar story) योग आला.

Namrata Patil

|

Oct 20, 2019 | 8:34 AM

बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार रिल लाईफमधील या गाण्याप्रमाणेच रिअल लाईफमध्ये सीधा-साधाचं आहे. अक्षयशी पहिल्यांदाच भेटण्याचा योग आला. निमित्त होतं इंडियन रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमानं सुरु झालेल्या ‘प्रमोशन ऑन व्हिल्स’ योजनेअंतर्गत हाऊसफुल एक्सप्रेसमध्ये झालेल्या ‘हाऊसफुल ४’च्या प्रमोशन इव्हेंटचं. काही सिलेक्टेड मीडिया अक्षयसोबत या प्रवासावर असणार (Story of Actor Akshay Kumar) होते. आता बरं ज्याचे सगळे चित्रपट अगदी फर्स्ट डे, फर्स्ट शो आपण थिएटरमध्ये बघितलेत. ज्याचा कुठलाही सिनेमा छोट्या पडद्यावर दिसला की परत परत बघण्याचा मोह आवरला जात नाही. मोहरा, खिलाड़ियो के खिलाडी, खिलाडी, मिस्टर एन्ड मिसेस खिलाडी, धडकन, हेराफेरी, आवारा पागल दिवाना, दिल्लगी, अंदाज, ऐतराज, बॉस, तु खिलाडी मे अनाडी, मुझसे शादी करोगी, रावडी राठोड आणि अशा अनेक सिनेमांची मग तो सुपरहिट असो वा सुपर फ्लॉप पार पीएचडी झाली आहे. जानी दुश्मनसारखा मल्टीस्टारर टुक्कार सिनेमाही मी अक्षयसाठी चारदा थिएटरला जाऊन बघितला होता.

शाळेत वार्षिक परीक्षा असल्यामुळे आईने केबल बंद ठेवली होती. त्यामुळे खिलाडीयो का खिलाडी केबलवर लागल्याचं कळताच मित्राकडे अभ्यासाला चाललो सांगून शेजाऱ्यांकडे बघितला होता. तीस मार खान, कम्बख्त इश्क, ब्लू, जोकर, बॉस हे सगळे चित्रपट एकांकिका स्पर्धांच्या काळात प्रदर्शित झालेले. त्यामुळे कॉलेजमधून एकांकिकेसाठी कोटेशन काढून अख्ख्या ग्रुपला घेऊन फर्स्ट डे फर्स्ट शो बघितले होते. आधी लगीन अक्षयच्या सिनेमांचं मग एकांकिकेचं. सगळे पैसे अख्ख्या ग्रुपला सिनेमा दाखवत असल्यामुळे संपून जायचे आणि नंतर स्पर्धेच्या वेळी मात्र ‘एल’ लागायचे. खिलाडी कुमारचा सिनेमा म्हणजे घरचं कार्य. एवढी अक्षयच्या सिनेमांची मला क्रेझ. असा तुमचा लाडका स्टार जेव्हा तुमच्या समोर येतो, एक दिवस तुम्ही त्याच्या सोबत घालवतात तेव्हा विचार करा अवस्था काय झाली असेल. मी तर पार क्लीनबोल्ड झालो होतो. अक्षयसोबत सध्य़ा बॉबी देओल, रितेश देशमुख, प्रचंड आवडणारी क्रिती सॅनन, तिच्यासोबतीला हॉट पूजा हेगडे, क्रिती खऱबंदा अशा ग्लॅमड़ॉल असतानाही नजर फक्त आणि फक्त अक्षयवर होती.

हाऊसफुल 4 एक्सप्रेसनं जायचं असं आधी काही नियोजन नव्हतं. कारण 20 वर्षांपासून ट्रेननं असा लांब पल्ल्य़ाचा प्रवास केला नव्हता. त्यामुळे मुंबई दिल्ली रेल्वेनं जायचं म्हणजे पोटात गोळा आला होता. पण आपला खिलाडी ट्रेनमध्ये असणार होता, तसेच येताना लगेचच फ्लाईटनं परतायचं होतं. त्यामुळे शेवटी निश्चय करुन या प्रवासावर जायचंच असा निर्णय झाला. नियोजित वेळेप्रमाणे ट्रेन मुंबई सेंट्रलवरुन दोन वाजता सुटली. अक्षयसह हाऊसफुलची संपूर्ण टीम फिल्मसिटीमध्ये कपिल शर्माच्या शोचं शूट करत होती, त्यामुळे ती सगळी मंडळी बोरीवलीतून बसणार होती. बोरीवली स्टेशनवर आपल्या लाडक्या सुपरस्टारला बघण्यासाठी तुफान गर्दी झालेली. बाऊंसर, पोलिस, सीआरपीएफ अशा सगळ्यांच्या गराड्यात अक्षयसह संपूर्ण टीम ट्रेनमध्ये चढली. चार-चारचे ग्रुप करुन इंटरव्ह्यू होणार होते. बरं त्यादिवशी नशीब खऱ्या अर्थानं जोरात (Story of Actor Akshay Kumar) होतं.

कारण पहिल्याच टप्प्यात माझा नंबर होता. मग काय खिलाडीची वाट बघणं सुरु. जास्त वेळ लावता पूर्ण टीम 5.30 च्या सुमारास इंटरव्ह्यू होणार होते त्या बोगीत आली. मी आणि माझ्यासह अजून तिन वाहिन्यांचे प्रतिनिधी. अक्षयला समोर बघून माझी पाचावर बसली ना राव. बाकीचे तीन जण प्रश्न विचारतायेत आणि मी मात्र खिलाडीकडे बघून फक्त बसत बसलो आहे. काय बोलावं सूचतचं नव्हतं. बरं माझे जे प्रश्न होते ते माझ्या बाजूला बसलेल्या न्यूज नेशनच्या मित्राला चिठ्ठीवर लिहून दिलेत आणि त्या प्रश्नांची उत्तंर मला मिळालीत. (आता इथे काही अत्यंत विद्वान मंडळी म्हंटतील तु पत्रकार आहेस, असं वाहवून नाही जायचं, लाब लाब लाब लाब…पण ‘मामू’ लोग पत्रकार पण माणूसच असतो ना. नुसती मुलाखत घ्यायची असती तर बच्चनच्या पण नजरेत नजर भिडवू आपण. पण हा माहोलच जरा वेगळा होता ना राव. असो. ) तरी जाताना बाला गाण्यावर एक गुगली टाकणारा प्रश्न त्याला विचारलाच. त्यावर अक्षय रिएक्ट झाला तो असा , ‘क्या गट्टू मजे ले रहा है काफी. रुख जा रात को तुझे पहले बाला गाने पे नचाऊंगा, फिर जवाब दुंगा.’

इंटरव्ह्यू संपल्यावर जायला निघाला तेव्हा लागलीच त्याच्या टीमनं त्याला थांबवलं. अजून पाच ग्रुप बाकी असल्याचं त्याला सांगितलं. तेव्हा भाई चांगलाच वैतागला. म्हणजेच आता पुढच्या ग्रुपला तो पटापट कटवणार असं त्याच्या देहबोलीवरुन दिसलं. परत म्हंटलं आपलं नशीब आज जोरात आहे. आम्ही आपल्या बोगीत निघतांना थोड्या वेळानं परत भेटू, मस्त गेम खेळू असं बोलतांनाच अक्षयनं अजून सरप्राईज असणार असल्याचं जाहिर करुन टाकलं. आम्ही परत आपल्या बोगीत आलो. मग मित्रमंडळींसोबत गप्पांचा फड रंगला.

ट्रेन स्पेशल असल्यामुळे नॉनस्टाप होती. फक्त काही सामान घेण्यासाठी सिलेक्टेड स्टेशनवर थांबणार होती. गप्पा रंगात आल्या असतानाच 8 वाजता बोलावणं आलं चलो सरने गेम खेलने बुलाया है. परत मिडल बोगीत सगळे जमलो. सिनेमाची टीम सुरुवातीच्या बोगीत होती. 10 मिनिटात त्यांचा सगळा लवाजमाही गेम्स होणार होते त्या बोगीत आला. आता इथं पण नशीब जोरदार. जी काय जागा मला मिळाली त्याने इतरांच्या पोटात तर प्रचंड जळजळ व्हायला लागली होती.

भाई तेरी किस्मत अच्छी है, क्या जगह मिली भाई. कारण ट्रेनमध्ये सगळा हिंदी मीडिया. मराठी मीडियातून फक्त मीच. त्यामुळे त्यातले क्वचितचं मित्र. असो.(हा विषय वेगळा) तर अक्षयाची सगळी फौज आली. माझ्या समोर अक्षय, त्याच्या बाजूला रितेश, क्रिती सॅनन आणि पूजा हेगडे. इथपर्यंत ठीक होतं. पण माझ्या बाजूला क्रिती खरबंदा येऊन बसली. आता या क्षणी जी अवस्था झाली होती ती शब्दात व्यक्त नाही करु शकत. समोर बॉलिवूडचा मोठा स्टार, काजूकतलीसारखी क्रिती सॅनन, लक्ष्मी बॉम्ब पूजा हेगडे आणि बाजूला रसमलई क्रिती खरबंदा. आवाजचं बंद.

त्य़ावेळेस झालेली अवस्था शब्दात व्यक्त नाही करु शकत. आता रितेशशी थोडा परिचय असल्यामुळे त्याच्याशीच नजरेतून- इशाऱ्यातून बोलणं सुरु होतं. तर अक्षयनं त्याच्या स्टाईलमध्ये हौजी खेळणार असल्याची अनाऊसमेन्ट केली. जो फुल हौजी जिंकेल त्याला ४० इंची कलर टीव्ही, कॉर्नर हौजी, अप्पर हौजी, डाऊन हौजी असे बरेच वर्ग केलेत. बरं त्यातल्या विजेत्यांनाही पॉवर बॅंक, हार्ड ड्राईव्ह, म्युझिक सिस्टीम अशी बक्षिसांची बरसात होणार असल्याचं जाहीर केलं. बरं हे करत असतांना अक्षय चंकी पांडेची फुल ऑन घेत होता आणि बॉबी देओलचा तर काय चाललंय हे असा एप्रोच होता. त्यामुळे तो अक्षयच्या मागच्या सीटवर निवांत बसला (Story of Actor Akshay Kumar) होता.

तर हौजी सुरु झाली. मला मुळात हौजी हा गेमच माहिती नव्हता. त्यामुळे काय चाललंय अशा प्रश्नार्थक मुद्रेने मी फक्त आनंद घेत होतो. समोर आणि बाजूला ‘क्रिती’मय वातावरण असल्यामुळे स्टेच्यु पोझिशनमध्ये फक्त हसत होतो. या सगळ्यात पहिल्यांदाच जवळून अक्षयचा अनुभव घेतला. या माणसाचा कॉमिक टायमिंग आणि एनर्जी भन्नाट. तर एक एक करुन हौजीचा विजेता जाहीर होत होता. आता इथेही नशीब जोरात. क्रिती खऱबंदाला मी गरीब गाय असल्याची जाणीव झाली आणि तिनं माझी चिठ्ठी बघितली. चिठ्ठी बघण्याच्या काही मिनिटाअगोदर कॉर्नर हौजी जिंकणाऱ्याला म्युझिक सिस्टिम बक्षिस मिळाली होती.

क्रितीनं जखमेवर मिठ चोळत सांगितलं अरे आप के तो सब नंबर सही आ रहै है. अच्छे से देखो. कॉर्नरवाला सब नंबर तो कब का गिरा है, रुखो जरा म्हणत तिने लाईन पूर्ण केली. जर खेळ येत असता तर म्युझिक सिस्टिम आपली असती असं म्हणत मी स्वत:ला दोष देला. आता मात्र क्रितीनं आयडिया दिल्यामुळे कसं खेळायचं याची आयडिया आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. फुल हौजीचा विजेता ही ठरला होता. पण नंतर ऑन पब्लिक डिमांड सेकंड फुल हौजी विजेताही काढू असं ठरलं आणि खेळ सुरु झाला. आता मात्र भाई जिंकायचंच असं ठरवलं.आणि तिसऱ्यांदा नशीबानं साथ दिली. आपला मटका लागला ना भाई. जिंकलो. ७ जण जिंकलो जिंकलो करत पुढे आले होते. पण क्रिती खरबंदानंनं बाकीच्यांशी भांडत अक्षयला मी आधी चिठ्ठी दिल्याचं सांगितलं. यावर अक्षय रिएक्ट झाला तो असा, अरे हा मेरी झांसी की रानी ये ही जिता है..क्या रे गट्टू बाजू में बैठके क्या जादू कर दिया मेरी हिरोईन के उपर…मग काय खिलाडी कुमारनं मला विजेता घोषित करताच अपून तो डायरेक्ट आसमान में गया.

या सगळ्या गदारोळात तिन सुपरकुल नायिकांच्या हस्ते बक्षिस स्वीकारतानाचा फोटो आमच्या एका मित्राला नीट टीपता आला नाही. फोटोत नायिकांचे हात आणि माझे हात बसं एवढचं दिसतंय. त्याला नंतर प्रचंड शिव्यांची लाखोली वाहिली. हौजीची धमाल संपल्यावर मग सुरु झाला अंताक्षरीचा कार्यक्रम. त्याआधी सध्या राष्ट्रीय कार्यक्रम असलेला ‘बाला’ गाण्यावर डान्स झाला. 15 मिनिट अक्षयसोबत सगळेच कलाकार आणि मीडियाकर्मी मनसोक्त फक्त नाचत होते. अक्षय एवढा मोठा स्टार असूनही फुल एनर्जीनं धिंगाणा करत होता.

लहान मुलासारखा भांडत होता. त्याच्याच सोबत मागेपुढे करिअर सुरु केलेले बॉबी देओल आणि चंकी पांडे आपल्या बोगीत निघून गेले होते. पण अक्षय त्याच्या तीन नायिका आणि रितेशसोबत फुल टु धमाल करण्यात बिझी होता. एरवी रात्री 9.30 ला झोपणाऱा अक्षय रात्रीचे 10.45 झाले तरी दंगा करण्याच्या मुडमध्ये होता. शेवटी १०.४५ ला बरीच रात्र झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. (बरीच रात्र अक्षयसाठी होती बरं का) आणि लागलीच त्याने सगळ्यांना उद्या सकाळी भेटू, तुम्ही पण सगळे जेऊन झोपा म्हणत काढता पाय घेतला.

मुंबईतून दुपारी 2 वाजता सुरु झालेला हा प्रवास दिल्लीत दुसऱ्या दिवशी 12 वाजता जाऊन संपला. नुसती मुलाखत असती 10 ते 15 मिनिट अक्षयशी भेट झाली असती. पण हा 18 तासांचा संपूर्ण प्रवास होता. त्यातला बराच वेळ हा अक्षयसोबत अक्षयच्या बाजूला गेला. त्यामुळे अक्षय कुमार हे रसायन कळलं. 52 व्या वर्षीही या माणसामध्ये अफाट उर्जा आहे. लहान मुलांसारखा खोडसाळपणा आहे. त्याचा कॉमिक टायमिग तर भन्नाट आहे. आपला क्रश पहिल्यांदा भेटल्यावर एखादी मुलीच्या डोळ्यात जे तेज असतं. तसंच काहीसं माझ्य़ा डोळ्य़ात होतं.नि:शब्द. (आता अक्षय माझा क्रश नाही तर आयडॉल आहे. उगाच चुकीचे अर्थ नको) वर्षाला हा माणूस चार सिनेमे करतो.

म्हणजे त्या सिनेमांचं शूट, नंतर त्याचं प्रमोशन, जाहिरातींचं शूट पण असतंच. इतर इव्हेंट वेगळे. एवढं सगळं असून सुध्दा या माणसात एनर्जी राहते कसं काय असा प्रश्न पडलायं. त्याच्या वयाच्या अभिनेत्या चेहऱ्यावर वय जाणवू लागलंय. पण हा गडी आहे तसाच. सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या गदारोळात ट्विंकल खन्नाचा फोन येताच. सामान्य नवऱ्यासारखा बीवी का फोन है हट बाजू, बीवी का फोन है हट बाजू असं म्हणत मागे पळाला. तर प्रवासादरम्यान, ट्रेनमध्ये चढतांना, उतरतांना आपली मुलगी निताराची काळजी घेत होता. हा प्रवास खरंच न विसरण्यासारखा आहे. कारण यात मला माझ्या आवडत्या हिरोचा जवळून अनुभव घेता आला. बराच बॅड पॅच या माणसानं बघितलायं. 90 च्या दशकात तर सलग फ्लॉप चित्रपटांमुळे त्याचं करिअर संपण्याच्या मार्गावर (Story of Actor Akshay Kumar) होतं.

तेव्हाच्या मोठ्या स्टार्सनं त्याला 50 टक्के अॅक्टर म्हणून हिणवलं तर कोणी मोठ्या पडद्यावर माकडचाळे करणारा अभिनेता म्हणून हिणवलं. पण अक्षय या टीकांनी कधीच डगमगला नाही. हेराफेरी या सिनेमानं त्याला नवसंजीवनी दिली आणि त्यानंतरही या संधीचं सोनं करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत परत कधीच मागे वळून बघितलं नाही. आज यशाच्या ज्या शिखरावर अक्षय आहे तिथून त्याला आकाश ही ठेंगणं वाटत असेल, मात्र तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. खान मंडळींच्या प्रवाहात अक्षय आपले पाय बॉक्स ऑफिसच्या बाजारात घट्ट रोवून आहे. खान्सला तगडी फाईट देतो आहे.

एकेकाळी सुपरस्टार पदावर आरुढ असताना भर पुरस्कार सोहळ्यात अक्षयला माकड म्हणून हिणवणारा शाहरुख खान आज एका हिटसाठी तरसतो आहे. अक्षय मात्र आज बॉलिवूडचा सगळ्यात जास्त कमाई करणारा, टॅक्स भरणारा अभिनेता आहे. सामाजिक कार्यात ही तो नेहमी तत्पर. विशेष म्हणजे देशाप्रती, सैनिकांप्रती त्याला प्रचंड आपुलकी. देशभक्तीपर सिनेमे करतो म्हणून त्याला नवा भारत कुमार म्हणून हिणवलं जातं. पण अक्षय आपल्या कामातून सगळ्यांची तोंडं बंद करतो. अशा या खऱ्या दिलदार खिलाडी माणसासोबतचा प्रवास शब्दात व्यक्त करणं कठीण होतं, पण तरीही हिंमत करत शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. बॉलिवूडचा खिलाडी एकच… ‘ना ये अमिताभ, ना दिलीप कुमार ना किसी हिरो का बच्चा, ये है सीधे साधे अक्षय..अक्षय.’..

(NOTE : लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें