पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 12, 2020 | 11:39 AM

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. (Maharashtra graduate and teachers constituency election all about to know)

पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?

मुंबई: राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदार संघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Maharashtra graduate and teachers constituency election all about to know)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज १२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. उद्या 13 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

सध्या कोणत्या मतदारसंघात निवडणूक?

राज्यात सध्या औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क कुणाला?

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांना मतदान करता येत नाही. कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून केवळ पदवीधर किंवा समकक्ष पात्रता असलेला व्यक्तीच मतदान करू शकतो. विधानपरिषदेच्या एकूण संख्येपैकी जवळजवळ एक बारांश सदस्य हे भारताच्या कोणत्याही राज्यातील, कोणत्याही विद्यापीठाचे किमान तीन वर्षे आधी पदवीधर असलेले किंवा विद्यापीठाच्या पदवीधरांशी समकक्ष असलेल्या पदव्या असलेले नागरिक निवडून देतात. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण 72 सदस्य आहेत. त्यापैकी 6 सदस्य पदवीधर मतदारसंघातून येतात.

मतदार नोंदणी कधी करायची असते?

पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंतही मतदार नोंदणी चालूच असते. निवडणूक आयोग ही यादी सातत्याने अपडेट करत असतात. त्यामुळे पदवीधर तरुणांना उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत आपली मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळते.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराची पात्रता

पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत. तसेच संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

कार्यकाळ

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडून येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क कुणाला?

शिक्षकांच्या मतदारसंघात, माध्यमिक किंवा उच्च विद्यालयामध्ये जे पूर्ण वेळ शिक्षक आहे, ते शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान करतात.

शिक्षक मतदारसंघासाठी कोण अर्ज करू शकतो?

किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या अशा राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत आहे, अशा व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरता येतो.

अशी रंगणार लढत

  • नागपूर पदवीधर मतदारसंघातील लढत

अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

  • औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघातील लढत

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs जयसिंगराव गायकवाड (भाजप) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)

  • अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघाली लढत

श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

  • पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत

जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

संबंधित बातम्या:

विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस, राजकीय पक्षांची लगबग

पुणे पदवीधर निवडणूक : महायुतीतील घटकपक्षामुळे भाजपला डोकेदुखी, सदाभाऊ खोतांकडून उमेदवार जाहीर

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

(Maharashtra graduate and teachers constituency election all about to know)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI