Municipal Corporation Election: महापालिका निवडणुका फेब्रुवारीत? आचारसंहिता कधीपासून? राज्यातील बड्या मंत्र्याचा अंदाज काय?
Municipal Corporation Election: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील सावळ्या गोंधळानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठा धसका घेतला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा संताप तर आपण गेल्या दोन दिवसांपासून पाहत आहोत. आता महापालिका निवडणुका कधी लागतील याविषयी संभ्रम आहे. त्यातच या बड्या मंत्र्याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नमनालाच घडाभर तेल ओतले गेले. या निवडणुकीत गोंधळाचाच मुहूर्त साधल्या गेला. ओबीसी आरक्षण आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेवरून धाकाधूक असतानाच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा नारळ कधी फुटणार यावर तुफान चर्चा सुरू आहे. महायुतीमधील एका बड्या नेत्याने महापालिका निवडणुकीविषयी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, महापालिका निवडणुकीला (Municipal Corporation Election) फेब्रुवारी महिन्यात मुहूर्त लागण्याची दाट शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीला फेब्रुवारीत मुहूर्त?
राज्याचे परिवहन मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी महापालिका निवडणुकीविषयी मोठे भाष्य केले आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान लागण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तर त्यापुढे फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्यात तयारीसाठी अजून दोन महिन्यांचा मोठा कालावधी पक्षांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विरोधकांना सरनाईकांचा टोला
आम्ही शिवसैनिक आहोत. निवडणुका तोंडावरती घेऊन विकास करत नसतो. 365 दिवस सर्वसामान्य जनतेपर्यंत 24 तास राहण्याचा काम एकनाथ शिंदे आणि त्यांचे अनुयायी करत असतात. निवडणूक आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरा जातो, असे वक्तव्य सरनाईकांनी केले. कोकणातील भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यातील राड्यावर बोलताना निवडणुकीत तळागाळातला कार्यकर्ता नशीब आजमावत असतो. काही ठिकाणी एकत्र काही ठिकाणी वेगळे लढलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास केलाय अजून देखील उपमुख्यमंत्री काम करत आहेत. जनतेला न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहेत, असे ते म्हणाले.
ठाणे जिल्हा बालेकिल्ला
हा ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. आता हा बालेकिल्ला एकनाथ शिंदे यांचा आहे. कोणीही कितीही उड्या इथून तिथे मारल्या तरी शिवसेनेला फरक पडत नाही.या ठिकाणच्या सर्व महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती कोणी कुठे जाता कामा नये अशी भूमिका घेतली होती. कालच्या गोष्टी घडल्या, त्या कशा घडल्या मला माहिती नाही मुख्यमंत्री जातीने लक्ष देतील.
निवडणुकीतील पैसे वाटपाबाबत काय म्हणाले.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी या निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटप केल्याचा आरोप केला. त्यावर सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तीनच नेते फिरत होते.देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी बांधून दहा दिवसात 53 सभा घेतल्या हा इतिहास आहे. कोणीही वल्गना करू नये. त्यांना जर बोलायचं असेल तर त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी कोण उतरलं असा सवाल प्रताप सरनाईक यांनी विचारला. कोणी काही बोलू नये.. ठाकरे बंधू कुठे दिसले नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते प्रचारात उतरले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. आम्ही कार्यकर्त्यांना बळ दिलं. त्या बळामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येणार आहेत, असे मतं त्यांनी मांडलं.
