गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी 15 दिवसात 42 वाहने जाळली

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी 15 दिवसात 42 वाहने जाळली

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धुमाकुळ सुरुच असून नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जाळपोळ केली आहे. मागील 15 दिवसात गडचिरोलीत घडलेली ही तिसरी जाळपोळीची घटना आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीत ऐमली-मंगूठा रस्त्यावर ही जाळपोळ करण्यात आली. यात रस्त्याच्या कामासाठीचे टँकर, 2 सिमेंट काँक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर आणि सेंट्रिंग वापराच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.

नक्षलवाद्यांनी मध्यरात्रीच्या वेळी जाळपोळ केली. यवतमाळच्या शाम बाबा कन्स्ट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा यांच्याकडे या रस्त्याच्या कामाचा ठेका असल्याचे सांगितले जात आहे. जाळण्यात आलेली वाहने आणि साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्या मालकीचे होते.

15 दिवसांमध्ये 42 वाहने जळून खाक, 15 जवान शहीद, 3 नागरिकांची हत्या

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे. नक्षलवाद्यांकडून कुठे ना कुठे शासकीय मालमत्तेची जाळपोळ सुरु आहे. 30 एप्रिल रोजी कुरखेडा येथे 36 वाहने जाळली, 8 मे रोजी एटापल्ली तालुक्यात 3 वाहने आणि आज पुन्हा 3 वाहने जाळण्यात आली. गडचिरोली भुसुरुंग स्फोटातही 15 जवानांसह एक चालक शहीद झाला. यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन 2 आदिवासी नागरिकांचीही हत्या केली. त्यामुळे सध्या गडचिरोली जिल्ह्यात दहशतीचे सावट आहे. या नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे कंत्राटदारांनी अनेक कामं बंद केली आहेत. गडचिरोली पोलिसांनी ठोस कारवाई न केल्यास गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचे वर्चस्व तयार होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.


Published On - 8:26 pm, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI