मुलांना जबाबदार बनवायचंय? मग 3 नियम आजपासूनच वापरायला सुरुवात करा
लकांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या बालपणात मिळालेल्या संस्कारांचा आणि सवयींचा खोलवर परिणाम होतो. लहान वयातच मुलांमध्ये जबाबदारीची भावना, निर्णयक्षमतेची जाणीव आणि स्वतःच्या कृतींचं भान निर्माण झालं, तर ते मोठेपणी आत्मनिर्भर, समंजस आणि समाजासाठी उपयुक्त नागरिक बनू शकतात

आपण सर्वच पालक आपल्या मुलांना यशस्वी आणि समजूतदार व्यक्ती बनवण्याचं स्वप्न पाहतो. मात्र, केवळ इच्छा असून उपयोग नाही त्यासाठी लहानपणापासूनच योग्य सवयी आणि मूल्यांची पायाभरणी करावी लागते. बालवयात जे शिकवलं जातं, त्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचं मूल पुढे जाऊन जबाबदारीने वागावं, समाजात आदर्श ठरावं, तर तुम्हाला तीन महत्त्वाचे उपाय नक्की अमलात आणावे लागतील.
अंगावर छोट्या – छोट्या जबाबदार्या टाका
अनेक पालकांना वाटतं की, लहान मुलांना जबाबदारी देणं म्हणजे त्यांच्यावर ओझं टाकणं. पण हीच चुकीची समजूत त्यांचं आत्मनिर्भर बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा ठरते. सुरुवातीला अगदी सोप्या आणि वयाला साजेशा जबाबदाऱ्या द्या जसं की खेळणी खेळून झाल्यावर स्वतः ठेवणं, आपलं अंथरूण व्यवस्थित करणं, शाळेतून आल्यावर टिफिन आणि बाटली स्वतः ठेवणं. जर घरी पाळीव प्राणी असतील, तर त्यांना खाऊ घालण्यास किंवा पाणी देण्यास सांगितलं तरी मूल जबाबदारी शिकतं. यामुळे त्यांना समजतं की प्रत्येक कृतीला एक ठराविक प्रक्रिया असते आणि त्यात स्वतःहून सहभागी होणं महत्त्वाचं असतं.
निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग ठेवा
फक्त सूचना देणं ही पालकत्त्वाची पूर्ण पद्धत नाही. मूल निर्णय प्रक्रियेत सहभागी झालं की त्यांचं आत्मभान आणि समज वाढते. उदाहरणार्थ, घरात नवीन काही विकत घ्यायचं असेल – जसं की सोफा, छोटी उपकरणं त्यात त्यांच्या मताला विचारलं पाहिजे. तसेच तुम्ही एखादा निर्णय का घेतला, त्याचे परिणाम काय असतील हेही समजावून सांगावं. जर मूल चुकीचा पर्याय निवडत असेल, तर सुरक्षिततेच्या मर्यादेत राहून त्याला त्याचे परिणाम भोगू द्या. यामुळे ते शिकतात की स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी लागते आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम स्वीकारायला शिकलं पाहिजे.
चुका घडल्यावर शिक्षा नाही, शिकवण द्या
मुलांकडून चुका होणं स्वाभाविक आहे. पण त्या चुकांवर आपला प्रतिसादच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करतो. डांटना, ओरडणं किंवा मार देणं या ऐवजी शांतपणे बोलून समजावून सांगण्याची भूमिका घ्या. उदाहरणार्थ, काहीतरी तुटल्यास विचारावं की ते कसं घडलं आणि पुढच्यावेळी अशा गोष्टी कशा टाळता येतील. शक्य असल्यास, ती गोष्ट दुरुस्त करताना त्यांना सहभागी करा किंवा नवीन वस्तूसाठी त्यांच्या पॉकेट मनीतून काही रक्कम खर्च करायला लावा. यामुळे ते शिकतात की चुकांपासून घाबरून पळून न जाता, जबाबदारी स्वीकारून त्यातून सुधारणा करणं महत्त्वाचं असतं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
