वॉटर फास्टिंग म्हणजे काय? तज्ञांकडून जाणून घ्या फायदे आणि तोटे
आजकाल लोकं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करत असतात. वॉटर फास्टिंग हा देखील त्यापैकी एक आहे. पण फक्त पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते का? या डाएटचा शरीराला कसा फायदा तसेच नुकसान होऊ शकतो आणि हा डाएट किती दिवस पाळता येईल हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

आजकाल लोकं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा व उपायांचा अवलंब करत असतात. यामध्ये व्यायामासोबतच योग्य आहाराचाही समावेश केला जातो. आजकाल, केटो आणि अनेक प्रकारचे डाएट खूप ट्रेंडिंग आहेत. जे स्वतःच्या आवडीनुसार पाळले जातात. या सर्व डाएटमध्ये लिक्विड डाएटचाही समावेश आहे, ज्यामध्ये फक्त लिक्विड पदार्थांचे सेवन केले जाते. त्याचप्रमाणे, वॉटर डाएट देखील आहे जे वजन कमी करण्यासाठी केले जाते.
नावाप्रमाणेच, वॉटर डाएटमध्ये फक्त पाणी पिणे समाविष्ट आहे. पण हे बरोबर आहे का कारण आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी सर्व प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, मग अशा परिस्थितीत, वॉटर फास्टिंग शरीराला फायदेशीर ठरतो की हानिकारक आहे आणि या दरम्यान कोणत्या चुका आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
तज्ञांचे मत
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील मुख्य आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल सांगतात की, वॉटर डाएट म्हणजे असा आहार ज्यामध्ये एखादी व्यक्ती काही वेळेसाठी फक्त पाणी पिते आणि कोणताही जड पदार्थ खात नाही, त्याला सामान्यतः वॉटर फास्टिंग असेही म्हणतात. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्थेला विश्रांती देण्यासाठी अधूनमधून वॉटर डाएट घेतला जाऊ शकतो, परंतु तो खूप विचारपूर्वक आणि मर्यादित काळासाठी पाळला पाहिजे. या डाएटमुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होऊ शकते, त्याचबरोबर भूक नियंत्रित करणे सोपे होऊ शकते आणि इन्सुलिनची पातळी देखील सुधारू शकते.
वॉटर फास्टिंगचे तोटे
काही लोकं धार्मिक उपवास करताना वॉटर फास्टिंगचा अवलंब करतात. पण हे फास्टिंग आरोग्यासाठी धोकादायक देखील आहेत. जास्त काळ फक्त पाण्यावर राहिल्याने शरीर कमकुवत होऊ शकते; या डाएटमुळे चक्कर येणे, थकवा येणे, कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी हा डाएट विशेषतः धोकादायक ठरू शकतो. वॉटर फास्टिंग सुरू करण्यापूर्वी, आरोग्य तपासणी करून घेणे आणि तुमच्या शरीराच्या गरजा जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. हे नेहमी तज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. या काळात, भरपूर विश्रांती घ्यावी लागते, व्यायाम टाळावा लागतो आणि शरीरात दिसणारी लक्षणे समजून घ्यावी लागतात. जर तुम्हाला अशक्तपणा, मळमळ किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या असतील तर ताबडतोब डाएट थांबवा आणि काहीतरी हेल्दी आहाराचे सेवन करा.
वॉटर फास्टिंग किती काळ आणि कसे करावे?
तज्ञांचे म्हणणे आहे की हा डाएट एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाळता येत नाही. वैद्यकीय देखरेखीखालीच हा आहार पाळणे खूप महत्वाचे आहे. हा आहार स्वीकारण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा आहार प्रत्येकासाठी नाही आणि तो योग्यरित्या आणि मर्यादित काळासाठी केला तरच फायदेशीर ठरेल, अन्यथा आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या प्रकारचा आहार स्वीकारणे सर्वात शहाणपणाचे आणि सुरक्षित आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
