मनसे, शिवसेना ठाकरे गट युतीबाबत काय वाटतं? आदित्य ठाकरे मनातलं बोलले
विजयी मेळाव्यानंतर राज्यभरात मनसे आणि ठाकरे गट युतीची जोरदार चर्चा सुरू आहे, यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये पाच जुलैला विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. तब्बल वीस वर्षानंतर या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमंक काय म्हणाले आदित्य ठाकरे?
सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे, दोन्ही भावाने एकत्र यावे यासाठी वातावरण आहे. यावर चर्चा होईल, पण हे सेंटिमेंट महाराष्ट्र हिताचं आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जनसुरक्षा विधेयकावर प्रतिक्रिया
दरम्यान नुकतीच जनसुरक्षा विधेयकाला मंजुरी मिळाली आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणतात की डावी विचारसरनी , पण ज्या देशात 80 टक्के लोक राशेन वर राहतात, ते सरकार कोणत्या विचारसरणीचे आहे डावं की उजवं? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ज्या योजना आपण काढतो त्या लेफ्टिंग आहेत, सध्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. भाजपचेच खासदार आहेत ते संविधान विरोधी आहेत. त्यांच्यावर हे कारवाई करणार आहेत का? आतापर्यंत ज्या कारवाया झाल्या त्या कोणत्या कायद्यांतर्गत केल्या? जे अतिरेकी, नक्षलवादी असतील त्यांना सोडायचं नाही, पण या कायद्यात जनसुरक्षा हित नाही, ते जे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आम्ही विरोध करत आहोत. यामुळे मीडियाचे सुद्धा स्वातंत्र्य निघून गेले आहे, अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान उद्यापासून मनसेच्या शिबिराला इगतपुरीमध्ये सुरुवात होणार आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार? काय भूमिका घेणार? युती संदर्भात काही बोलणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
