3 काळ्या रंगाच्या गाड्या, 12 जण; बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती टळली, येळंब घाटात थरार
बीडमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली असून, जिल्हा हादरला आहे.

काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडली होती, या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. संतोष देशमुख यांचं आरोपींनी आधी अपहरण केलं, आणि नंतर त्यांची हत्या केली. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता पुन्हा एकदा अशाच एका घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे, बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड तालुक्यातील येळंब घाट येथे आर्थिक व्यवहारातून सतीश डोईफोडे नावाच्या व्यापाऱ्याचं भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. आरोपींनी अपहरणासाठी आणलेल्या गाड्यांपैकी एक काळ्या रंगाची गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद देखील झाली आहे. भर चौकात तू तरी मरशील नाहीतर मी तरी मरण. हेव पट्ट्याच तुला संपवितो, अशी धमकी दिल्याचा एका व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे, यापूर्वी देखील अपहरणाचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील येळंब घाट येथील बस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे, सतीश डोईफोडे नामक व्यावसायिकाला तीन काळ्या रंगाच्या गाड्यातून आलेल्या 10-12 लोकांनी काल दुपारी 3 च्या दरम्यान उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र बस स्थानक परिसरात असलेल्या लोकांनी तेथे जमाव करून सतीश डोईफोडे यांची सुटका केली. यानंतर सदरील लोकांनी तेथून पळ काढला.
समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी दुपाराच्या सुमारास तीन चारचाकी गाडीतून दहा ते बारा लोक खाली उतरले त्यांनी डोईफोडे यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर त्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस स्थानक परिसरात असलेल्या लोकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे, त्यातील एक गाडी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, भर दिवसा व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानं जिल्हा पुन्हा एकदा हादारला आहे.
