मोठी बातमी! शेवटी भाजपानं डाव साधलाच, काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ
भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी बातमी समोर येत आहे, काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नेत्यानं भाजपात प्रवेश केला आहे.

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती आणि आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर? याबाबत अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता केवळ पक्षांचंच नाही तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं देखील टेन्शन वाढवत असल्याचं दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पहायला मिळालं, त्यानंतर आता पुन्हा एकदा ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना दिसत आहे. काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे आणि अमर सोनवणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईमध्ये माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वी जसा महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये प्रवेश सुरू असल्याचे पहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते आपल्याच मित्र पक्षात देखील प्रवेश करत आहेत. याचा मोठा फटका हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. शिवसेना शिंदे गटातील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती, मात्र अजूनही पक्ष प्रवेश सुरूच आहेत, सोमवारी गडचिरोलीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला तर आज मात्र काँग्रेसच्या नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
