महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, 60 दिवसात सगळं बदलणार? शरद पवारांच्या खासदाराचे भाकीत
खासदार बजरंग सोनवणे यांनी आगामी दोन महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाचे संकेत दिले आहेत. मी हवेत गोळ्या मारत नाही असं म्हणत त्यांनी केलेल्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येत्या दोन महिन्यात सरकारमध्ये बरेच काही बदल होणार आहेत, असे सूचक विधान बजरंग सोनवणे यांनी केले आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. यावेळी बजरंग सोनावणे यांनी एक मोठे राजकीय भाकित वर्तवले.
सगळे काही बरोबर होईल
“येत्या दोन महिन्यात सरकारमध्ये बरेच काही बदल होणार आहेत. या दोन महिन्यांच्या काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार आहे. मी काही हवेत गोळ्या मारत नाही, जे काही सांगतोय ते विचार करूनच सांगतोय. तुम्ही काही काळजी करू नका, सगळे काही बरोबर होईल”, असे विधान बजरंग सोनावणे यांनी केले. खासदार बजरंग सोनवणे यांच्या विधानामुळे महायुती सरकारमध्ये काही मोठी उलथापालथ होणार का? की महाविकास आघाडीत काही नवीन हालचाली सुरू आहेत? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
दरम्यान बजरंग सोनवणे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून जायंट किलर ठरले होते. त्यामुळे त्यांच्या शब्दाला राजकीय वजन आहे. त्यातच त्यांनी हवेत गोळ्या मारत नाही असे स्पष्ट केल्याने आता चर्चांना उधाण आले आहे. बजरंग सोनवणे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या विधानाचे गांभीर्य अधिक वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्याचे बदलणारे राजकीय वारे असल्याचे बोललं जात आहे.
बजरंग सोनवणे यांच्या या दाव्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होणार की महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या जवळ जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः बीड जिल्ह्यासारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागातून आलेल्या या वक्तव्याने आगामी ६० दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
