BMC Election 2026 : मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, बदाबदा पैसा टाकून…राज टाकरेंनी सांगितला भाजपाचा डाव!
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली. मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. अगोदर पालघरवर कब्जा केला जातोय, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीची आज (11 जानेवारी) संयुक्त जाहीर सभा झाली आहे. या सभेत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. मुंबई गुजरातशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. गुजरातला जोडून मुंबई महाराष्ट्राकडून काढून घेण्याचा कट रचला जातोय. त्याची आता सुरुवात झाली आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केली. तसेच उत्तर भारतीय, हिंदी भाषेवरूनही राज ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली. सांगली कोल्हापुरातून आलेल्या लोकांना मुंबईत घर नाकारले जात आहे. उत्तर भारतीयांना नोकऱ्या दिल्या जात आहेत, असे म्हणत मुंबईतील मराठी माणसांनी जागे होण्याची गरज आहे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
मुंबई गुजरातला न्यायची हे अगोदरपासूनच…
राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मुंबई विकत घेता येत नाही, तर बदाबदा पैसे टाकून जमीन विकत घेत आहेत. यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. हा भूगोल नीट समजून घ्या. वाढवण बंदराला लागून लगेच गुजरात आहे. मुंबई गुजरातला न्यायची, हे अगोदरपासूनच त्यांच्या डोक्यात आहे. त्यासाठी आधी पालघर ताब्यात घेतलं जातंय. वाढवण ताब्यात घेतलं जातंय. नंतर ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्व मुंबईला कसं जोडलं जाईल याचा लाँगटर्म प्लान सुरू आहे. आम्ही बेसावध आहोत. आपल्यात जाती जातीत भांडणं लावले जात आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
अजित पवारांच्या विरोधात पुरावे बैलगाडीतून पुरावे दिले होते
एकदा महाराष्ट्राच्या ताब्यातून मुंबई गेली तर मुंबईचा झारखंड केल्याशिवाय ते राहणार नाहीत. कुठूनही मते आणू. महाराष्ट्र आमचाच आहे, असे त्यांना वाटत आहे. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा भुजबळांना तुरुंगात टाकलं. आता मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. तसेच अजित पवारांच्या विरोधात पुरावे बैलगाडीतून गेले होते. आता म्हणतायत की कोर्टात केस आहे. तुम्ही पुरावे दिले होते तर ते कोर्टाला द्या की, असे आव्हानही राज ठाकरेंनी केले.
