उद्धव ठाकरेंसमोरच राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगीरी, मुंबईतल्या भर सभेत नेमकं काय घडलं?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्तावरील भाषणात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. तसेच मनसेला सोडून गेलेले परत येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

BMC Election 2026 : राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने प्रचार चांगलाच शिगेला पोहोचला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाता येईल, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न चालू आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तर राज्यातील भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट, ठाकरेंचा शिवसेना गट हे पूर्ण ताकदीने उतरले आहेत. आज (11 जानेवारी) पालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची एकत्र सभा झाली. या सभेला हजारोंचा जनसागर उपस्थित होता. विशेष म्हणजे या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मतं विकत घेतली जात आहेत. आज मुंबईवर संकट आलं आहे, त्यामुळेच आम्ही एकत्र आलो आहोत, असे राज ठाकरे म्हणाले. सोबतच त्यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
बाळासाहेब, माझे वडील आणि माँ इथे असायला हवे होते
या व्यासपीठावर मी बाळासाहेबांसोबत लहान असताना अनेकदा आलो. शिवसेनेची स्थापनाच इथे झाली. तेव्हा माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरेही उपस्थित होते. आमची माँही उपस्थित होती. या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्ही आज माझे आजोबा, बाळासाहेब, माझे वडील आणि माँ इथे हजर असायला पाहिजे होत्या. मुंबईसाठी आम्ही दोन भावांनी उभारलेला हा लढा इथे नसले तरी ते वरून पाहत असतील, अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगीरी
तसेच बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था मराठीवर काम करणाऱ्या आहेत. अनेक लोकं आहेत. त्यांनी आवाज उठवला. त्यांचे आभार मानतो. दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच २० वर्षानंतर मी पहिल्यांदा युती करतोय. त्यामुळे युतीच्या अख्ख्या प्रक्रियेत अनेक लोकांना तिकीट दिली गेली अनेकांना नाही दिली. अनेकजण नाराज झाले. काहींना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं. काही काही गोष्टी झाल्या. आमच्याही हातात काही गोष्टी नसतात. त्यांना दुखावणं आमचा हेतू नव्हता. मने दुखावलेल्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत राज ठाकरेंनी तिकीटवाटपात नाराज झालेल्यांची दिलगिरी व्यक्त केली. सगळे आपलेच आहेत. परत येतील. जे आता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही. त्यामुळे गेलेले परत येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
