कुठे देवदर्शन ठरलं काळ तर कुठे फिरणं पडलं महागात; बुडून 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू!
महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पुरूष, महिला पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. महाराष्ट्रभर पाऊस बरसत आहे. नदी नाल्यांना पूर आलेले आहेत. त्यामुळेच पर्यटणप्रेमी घराबाहेर पडून हिरवळीचा आनंद लुटत आहेत. मात्र याच कारणामुळे आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. बुलढाण्यात नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेले असताना दोन मायलेकींचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात इंद्रायणी नदीचा पूल कोसळल्याची घटना घडली. नांदेड, रायगड जिल्ह्यांतही अशाच काही घटना घडल्या.
रायगडमध्ये काय घडलं?
रायगड, माथेरान, नवी मुंबई येथे राहणारे तिघे पर्यटक माथेरानच्या तळ्यात बुडाले आहेत. सुमित चव्हाण आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख अशी बुडालेल्या पर्यटकांची नावे. नवी मुंबई येथून एकूण 10 जणांचा ग्रुप माथेरानमध्ये गेला होता. या ग्रुपमधील तिघे बुडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस व सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोध कार्य चालू करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये काय घडलं?
बासरच्या गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या धर्माबाद सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथे ही घटना घडली आहे. सर्वजण हैदराबादहून बासर येथे आले होते. तिथे ते बोटेने नदीपात्रात गेले आणि बेटावरन उतरून स्नान करत होते. मात्र यावेळी ही घडली दुर्दैवी घटना घडली. मृतांमधील तिघे हे एकाच कुटंबातील आहेत.
बुलढाण्यात काय घडलं?
बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी येथे देवी दर्शन घेऊन त्रिवेणी संगम नदीपात्रात आंघोळ करीत असताना मायलेकींचा पाय घसरल्याने नदीपात्रात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान या दोघींना वाचविण्यासाठी गेलेल्या दोन महिलाही पाण्यात बुडत असल्याने त्यांनी आरडाओरड केला असता स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. यात दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून मात्र दोन्ही मायलेकींचा पाण्यात बुडून करुण अंत झाला आहे.
दरम्यान नाकातोंडात पाणी गेल्याने पुनम जामोदे, वय 32 वर्षे आणि आरोही दामोदर वय 5 वर्ष या ह्या दोघीं मयलेकींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
