कोर्टाचा आदेश आला, आता पुढे काय? जरांगेंच्या आंदोलनावर फडणवीसांची थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला कारवाई करावी लागेल, असं फडणवीसांनी म्हटलंय. तसेच त्यांनी जरांगे यांच्याकडून कोणी चर्चेला आले तर चर्चा होईल, असेही यावेळी ते म्हणाले.

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर न्यायालयाने सुनावणी घेतली आणि काही निर्देश देत 2 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. जरांगे यांची प्रकृती खालावल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच नियम आणि अटी-शर्तींच्या अधीन राहून सरकार जरांगे यांना आंदोलनास परवानगी देऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आता न्यायायाच्या या निर्देशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुणे दौऱ्यावर होते.
न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली
मी प्रवासात होतो. न्यायालयाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी पाहिलेले नाही. पण मला समजल्यानुसार मनोज जरांगे यांना उपोषणाला जी परवानगी देण्यात आली होती, त्याला काही अटी-शर्ती होत्या. या अटींचे उल्लंघन झालेले आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी चालू आहेत, त्यावर न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे हे निर्देश पालन करणे हे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्या निर्देशांचे सरकार पालन करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
याचा निषेध झालाच पाहिजे
तसेच पुढे बोलताना बैठकीत आम्ही या आंदोलनावर काही तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. काही मार्ग काढता येतील का? मार्ग काढता तो तो न्यायालयात टिकेल का? यावर चर्चा झाली. न्यायालयात टिकणारा कायदेशीर मार्ग काढण्याची आमचा प्रयत्न आहे. जरांगे यांच्या आंदोलनात मुंबईत काही महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करण्यात आले. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांवर अशा प्रकारचा हल्ला करणे तसेच महिला पत्रकारांचा विनयभंग हे गालबोट लावण्यासारखे आहे. आपण याआधी 30 पेक्षा अधिक मराठा मोर्चे पाहिलेले आहेत. या मोर्चांची शिस्त आपण पाहिलेली आहे. या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकतेने घेतलेले निर्णयही आपण पाहिलेले आहेत. महिला पत्रकार किंवा पत्रकार हे त्यांचे काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. याचा सर्व स्तरावर निषेध झालाच पाहिजे, असे थेट मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
चर्चा नेमकी कोणाशी करावी?
मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की मनोज जरांगे यांचे काही शिष्टमंडळ असेल तर सांगावे. चर्चा नेमकी कोणाशी करायची? माईकवर चर्चा होत असते का? मला सांगा असा रोकठोक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही जमेल त्या मार्गाने चर्चा करत आहोत. सरकारला आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कुठलाही इगो धरत नाहीये. आम्ही मार्ग काढत आहोत. समोरून चर्चेला कोणी आले तर तोडगा लवकर निघेल, असेही पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुकाने चालू ठेवण्याचे निर्देश
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काही लोकांनी धुडगूस घातला. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. त्यानंतर लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला. पण तसं व्यापाऱ्यांना कोणीही तसे सांगितेल नव्हते. नंतर सरकारनेच व्यापाऱ्यांना सांगितले की त्यांनी दुकाने चालू ठेवावेत आम्ही पोलिसांचे संरक्षण देत आहोत, असे सांगत त्यांनी मनोज जरांगे यांनी मुंबईतील दुकाने मुद्दामहून बंद ठेवल्याचा आरोप फेटाळला.
