Nashik | कोरोनाचा पुन्हा धसका, मास्क नाही लावल्यास 500 रुपयांचा दंड

कोरोनाच्या नव्या विषाणूने गल्लीपासून दिल्लीपर्यंत साऱ्यांनाच खडबडून जागे केले आहेत. नाशिकमध्ये मास्क नाही लावल्यास नागरिकांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

Nashik | कोरोनाचा पुन्हा धसका, मास्क नाही लावल्यास 500 रुपयांचा दंड
संग्रहित छायाचित्र.

नाशिकः कोरोनाच्या (Corona) नव्या विषाणूने गल्लीपासून दिल्लीपर्यंत साऱ्यांनाच खडबडून जागे केले आहेत. एकीकडे राज्य सरकारने काही सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विशेषतः दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना काही दिवस तरी बंदी घालावी असे आवाहन केले आहे. शाळा सुरू होण्याबाबतही चालढकल निर्माण झाली आहे. या साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मास्क नाही लावल्यास नागरिकांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

अजून वाढतायत रुग्ण

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. सध्याही 457 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. त्यात निफाडमध्ये 85, सिन्नरमध्ये 81 रुग्ण आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 17 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत रुग्णांमध्ये 6 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 718 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे पाहता पुन्हा एकदा महापालिका प्रशासन दक्ष झाले असून, त्यांनी नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

गर्दी केल्यास कारवाई

सध्या लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्न सोहळे वाढले आहेत. अनेक मंगल कार्यालय, लॉन्सवर प्रमाणाबाहेर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे येथेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 18 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा दंड ठोठावूनही पुन्हा या ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले, तर थेट मंगल कार्यालय आणि लॉन्सला सील ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तिसऱ्या लाटेमुळे दक्षता

महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना तिसऱ्या लाटेबाबत आधीच दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात मास्कचा वापर करायला लावणे, सॅनिटायझेशन, सुरक्षित अंतराचे पालन, कुठेही जास्त गर्दी जमा होऊ नये याची दक्षता घेणे, या साऱ्या नियमांचे पालन करावे लागेल. मात्र, दुसरीकडे माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्या शाळांमध्ये कसल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. याबाबत सरकार या भूमिका घेणार हे महत्त्वाचे आहे.

इतर बातम्याः

पाणीपुरवठा बंद असल्याने आज नाशिककरांची निर्जळी; उद्याही कमी दाबाने पाणी, जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू

साहित्य संमेलनाचा यथासांग राजकीय कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीसह नेते आणि मंत्र्यांची फळीच व्यासपीठ गाजवणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI