‘तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर…’, धनंजय देशमुखांचा थेट इशारा
त्यांना असं वाटत आहे की आरोपींना वाचवलं पाहिजे. तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर तुमचा विनाश हा जगजाहीर आहे, असा इशारा यावेळी धनंजय देशमुख यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान हे प्रकरण सरकारनं सीआयडीकडे सोपवलं आहे, एसआयटीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, सीआडीने आरोप पत्र देखील दाखल केलं असून न्यायालयात सुनावणी देखील सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या 26 तारखेपासून खऱ्या अर्थाने न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होईल, जर तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर तुमचा विनाश हा जग जाहीर असेल, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, जरांगे पाटील यांच्या बरोबर न्यायालयीन प्रक्रियेबाबत चर्चा झाली, काही लोक कुठेतरी या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या विषयाला आम्ही कधीही वेगळी दिशा मिळू देणार नाही. आम्ही कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही. मात्र काही ठराविक लोक आरोपीचे समर्थन करत आहेत, हे प्रकरण मागे टाकण्यासाठी काहीतरी वेगळं करत आहेत. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याचे समर्थन करणारे कोण असतील, त्यांना असं वाटत आहे की आरोपींना वाचवलं पाहिजे. तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर तुमचा विनाश हा जगजाहीर आहे, असा इशारा यावेळी धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या देशमुख कुटुंबावर कुठलेही आरोप नाहीत आम्ही फक्त न्याय मागत आहोत. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाहीत. 26 मार्च ही न्यायालयाने या प्रकरणात तारीख दिली आहे, आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असं धनंजय देशमुख यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, या भेटीनंतर ते बोलत होते.