Omraje Nimbalkar : रील स्टार की रियल स्टार? ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिव का? तिथली वास्तव परिस्थिती काय
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एक संवेदनशील राजकीय नेता अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी, तळागाळातील जनतेशी तगडा जनसंपर्क असलेला नेता म्हणून ते ओळखले जातात. हे ओमराजे निंबाळकर म्हणजे रील स्टार की रियल स्टार? ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिव का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घ्या.

महाराष्ट्रात नुकतचं एक बंड झालं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 9 पैकी 6 खासदार फुटले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, संजय पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर हे दोन वर्षांपूर्वी निवडून आलेले खासदार ठाकरे गटातून बाहेर पडले. हे खासदार पक्षातून फुटण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. विकासनिधीची कमतरता, स्थानिक पातळीवरील राजकारण, पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष, मान-अपमान, राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणं असे वेगवेगळे कंगोरे त्यांच्या बंडामागे आहेत. या फुटलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती ओमराजे निंबाळकर यांची. कारण एक संवेदनशील राजकरणी, माणूसकी जपणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागच्यावर्षी मराठवाड्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा स्वत: नदी, नाल्यात उतरुन त्यांनी पूरग्रस्तांची सुटका केली होती.
त्यांच्या या कामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी सर्वच स्तरातून त्यांचं भरभरुन कौतुक झालेलं. ते रियल हिरो ठरलेले. पण आता दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना रिल स्टार म्हणून हिणवलं जात आहे. ज्या सोशल मीडियावर ते हिरो ठरले, तिथेच त्यांना प्रचंड ट्रोल केलं जातय. कारण ओमराजे निंबाळकर म्हणजे विश्वास, शब्दाला उभा राहणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक क्रेझ आहे. अशा ओमराजेंना ठाकरे गट सोडण्याचा निर्णय अनेकांना पटलेलं नाही. सोशल मीडियावरील त्यांच्या फॉलोअर्सची घटलेली संख्या हे एक त्याचं छोट्स उदहारण आहे. जवळपास तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आलेल्या ओमराजेंनी असा निर्णय का घेतला असावा? भविष्यातील त्यांच्या राजकारणावर या निर्णयाचा काय परिणाम होईल? धाराशिवची जनता त्यांच्यामागे जाईल का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
नाईलाजाने राजकारणात आले
सर्वप्रथम आपण ओमराजे निंबाळकर राजकारणात का आले? त्याची पार्श्वभूमी समजून घेऊया. ओमराजे निंबाळकर यांचे वडिल पवनराजे निंबाळकर हे धाराशिवच्या राजकारणात सक्रीय होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग तिथे होता. या पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी नवी मुंबईच्या कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप होता, त्यांचे चुलत बंधु पद्मसिंह पाटील यांच्यावर. तीनच दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल लागला. सबळ पुराव्याअभावी आणि तपासात अनेक त्रुटी राहिल्याने पद्मसिंह पाटील आणि अन्य आरोपींची निर्दोष सुटका झाली. हा ओमराजे आणि त्यांच्या कुटुंबासाठी धक्का होता. कारण वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी तब्बल 20 वर्ष त्यांनी कायदेशीर लढा दिला. पण अखेरीस निराशा झाला. आता या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार आहे. ओमराजेंना राजकारणात यायचं नव्हतं. पण वडिल पवनराजेंची हत्या झाल्यामुळे नाईलाजाने वयाच्या 22 व्या वर्षी त्यांना राजकारणात पाऊल ठेवावं लागलं.
सत्तापालट घडवून आणला, त्यावेळी त्यांचं वय होत अवघं 23
आपल्या राजकीय विरोधकाला अशा पद्धतीने आयुष्यातून संपवून राजकारणात यशस्वी होता येत नाही हेच त्यांना विरोधकांना दाखवून द्यायचं होतं. ओमराजेंनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम चुणूक दाखवली ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत. आत्ताचा धाराशिव जिल्हा पण त्यावेळचा हा उस्मानाबाद जिल्हा. या जिल्ह्याच राजकारण आजही निंबाळकर आणि पाटील घराण्याभोवती फिरतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या पद्मसिंह पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड होती. पण ओमराजे निंबाळकरांनी वडिलांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेत सत्तापालट घडवून आणला. त्यावेळी त्यांचं वय होत अवघं २३. ओमराजेंनी त्यावेळी डॉ.पाटील यांच्या ताब्यात असलेला तेरणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुद्धा जिंकली. ओमराजे निंबाळकर त्यावेळी काँग्रेस पक्षात होते.
टोकाची राजकीय वैरभावना होती
पुढे 2009 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या राजकारणात काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसने इथून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह यांना उमेदवारी दिली. पवनराजेंच्या हत्येमुळ निंबाळकर आणि पाटील घराण्यात टोकाची राजकीय वैरभावना होती. ओमराजेंसमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता. राणा जगजीतसिंह यांचा प्रचार ते करणं शक्यच नव्हतं. मग ओमराजेंनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ओमराजेंकडे राजकीय ताकद असल्याने शिवसेनेने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ओमराजेंनी राणा जगजीतसिंह यांचा पराभव केला. आमदार म्हणून विधानसभेवर गेले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीला अनुकूल वातावरण असूनही ओमराजेंचा पराभव करण्यात राणा जगजीत सिंह यशस्वी ठरले. त्यानंतर 2019 आणि 2024 च्या सलग दोन लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. 2019 मध्ये लोकसभेला राणा जगजीतसिंह यांना हरवून 2014 चा हिशोब चुकता केला. 2024 मध्ये त्यांनी अर्चना पाटील यांना हरवलं. दोन्हीवेळा त्यांनी कट्टर विरोधक पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पराभव केला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय?
आजचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ पूर्वीचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. स्वतंत्र भारतात 1952 साली पहिली लोकसभेची निवडणूक झाली. तेव्हापासून 1991 पर्यंत धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड होता. इथून सतत काँग्रेसचे उमेदवार निवडून यायचे. यात काँग्रेसचे अरविंद कांबळे यांनी तब्बल चारवेळा लोकसभेवर धाराशिवचं प्रतिनिधीत्व केलं. ते सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार आहेत. अरविंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे रहिवासी होते. पण ते 1984 पासून धाराशिवमधून निवडून आले. 1995 पर्यंत धाराशिववर एकहाती काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1984 ते 2009 पर्यंत हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारासाठी राखीव होता. पण 1996 साली पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने इथे काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. 1996 साली पहिल्यांदा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी कांबळे विजयी झाले.
1984 ते 1991 तीनवेळा धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अरविंद कांबळे विजयी झाले. 1996 शिवाजी कांबळे, 1998 अरविंद कांबळे, 1999 शिवाजी कांबळे, 2004 कल्पना नरहीरे, 2009 पद्मसिंह पाटील, 2014 रवींद्र गायकवाड आणि 2019, 2024 ओमराजे निंबाळकर इथून खासदार म्हणून निवडून आले.
ओमराजे म्हणजे धाराशिव नाही असं का?
धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांवर नजर टाकली तर उमरगामधून ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी आमदार आहेत. तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत. धाराशिवमधून ओमराजेंचे मित्र उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील आमदार आहेत. परांडामधून शिंदे गटाचे तानाजी सावंत आमदार आहेत. जर, तुम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शिवसेनेचं इथे संघटनात्मक वर्चस्व आहे. म्हणून 1996 पासून लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. आजही ओमराजेंच्या बंडात दोन आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. म्हणूनच ओमराजे म्हणजे धाराशिव नाही. 2029 च्या लोकसभा आणि विधानसभेला निवडून येण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतील.
खासदार निधीबद्दल ओमराजे काय म्हणाले?
ओमराजे यांनी विकासकाम आणि जिल्ह्यातील राजकारणात होत असलेली पिछेहाट या दोन कारणांमुळे पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याच सांगतात. खासदारनिधीचा कसा वापर केला, त्या बद्दल त्यांनी सविस्तर आकडेवारी सांगितली. खासदारला पाच वर्षांच्या काळात जो निधी मिळतो तो शिल्लक राहत असेल तर ते त्या खासदाराचं अपयश आहे. पण 2019 ते 2024 या काळात आपल्या खासदार निधीतील एकही पैसा शिल्लक राहिला नाही, असं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये एकही सदस्य निवडून आला नाही. हे सुद्धा पक्ष सोडण्यामागचं एक कारण असल्याचं ते म्हणाले.
