भाजपाला सर्वात मोठा झटका! राष्ट्रवादीच्या नेत्याने घेतला अचंबित करणारा निर्णय, आता थेट…
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत एकत्र लढण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. मात्र आता भाजपाला सर्वात मोठा धक्का बसला आहे.

Gadchiroli Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशाजशा जवळ येत आहेत, तसे तसे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेतेमंडळी सोईच्या पक्षात उड्या घेताना दिसत आहेत. तर पक्षाचे शीर्षस्थ नेते युती आणि आघाडीचे गणित कसे जुळवता येईल, याकडे लक्ष देत आहेत. शक्य होईल तिथे आम्ही एकत्र लढू, असे महायुतीकडून सांगितले जात आहे. असे असतानाच निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना महायुतीला धक्का देणारी घोषणा समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांनी ही घोषणा केली आहे. सोबतच त्यांनी भाजपावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
धर्मराव बाबा अत्राम यांची मोठी घोषणा
गडचिरोली चामोर्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव आत्राम यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या पदाधिकारी तसेच नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अहेरी विधानसभेतील पाच तालुक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुका आमचा पक्ष स्वबळावर लढवणार आहे, अशी घोषणा आमदार धर्मराव आत्राम यांनी यावेळी केली. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू. महायुतीने प्रस्ताव ठेवला तर ही मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. नाहीतर आम्ही तेही महायुतीने काही प्रस्ताव ठेवला तर विचार करू अन्यथा 51 जागांवर निवडणूक लढण्याची राष्ट्रवादी पक्षाची तयारी असल्याचे अत्राम यांनी जाहीर केले.
माझ्या पुतण्यालाच माझ्याविरोधात उभे केले
यावेळी अत्राम यांनी आपल्या भाजपा या मित्रपक्षावरदेखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले. भाजपकडून विधानसभेत मला पराभूत करण्याच्या प्रयत्न करण्यात आला. माझा पुतण्या अमरीश राव आत्राम यांना डमी उमेदवार म्हणून भाजपने माझ्याविरोधात उभे केले. राज्यात महायुती असताना विधानसभेत माझ्याविरोधात असे राजकारण चालले आहे, असा गंभीर आरोप अत्राम यांनी केला आहे.
कोणत्या पक्षाची सरशी होणार?
दरम्यान, आता अत्राम यांच्या या घोषणेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवल्यास तिथे भाजपादेखील पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे कोणत्या पक्षाची सरशी होणार? सोबतच गडचिरोली जिल्ह्याप्रमाणेच इतर जिल्ह्यांतही असाच स्वबळाचा निर्णय घेतला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
