माझ्यासोबत तुमचीही मेडिकल करू, मद्यधुंद वाहतूक पोलिसांना डॉक्टराने दाखवला इंगा, नेमकं काय घडलं?
उल्हासनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांना महाशिवरात्रीच्या यात्रेतून परतताना मद्यधुंद वाहतूक पोलिसांनी ड्रंक ड्रायव्हिंगचा आरोप केला. पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली आणि मेडिकल चाचणीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

मद्यधुंद वाहतूक पोलिसांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांवर ड्रंक अँड ड्राईव्हचा आरोप करत उद्धट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे हे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या यात्रेत आरोग्य सेवा करत होते. रात्री गर्दी कमी झाल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याजवळील प्रेम ऑटो पेट्रोलपंपावर त्यांनी पेट्रोल भरलं. पेट्रोल पंपावरून बाहेर येताच युनूस मुलानी आणि अन्य दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप केला.
वाहतूक पोलीस नशेत
त्यावर मी जिल्हा शल्यचिकित्सक असून कधीच दारू पीत नसल्याचं असे डॉ. बनसोडे यांनी सांगितले. ‘तुमच्या कपाळावर तुम्ही जिल्हा शल्यचिकित्सक असल्याचं लिहिलं आहे का?’ अशा उर्मट भाषेत त्यांनी डॉ. बनसोडे यांच्यासोबत वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली. इतक्यावरच न थांबता आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला, तुमची मेडिकल टेस्ट करावी लागेल असं त्यांनी डॉक्टर बनसोडे यांना सांगितलं. हे तिघेही वाहतूक पोलीस दारू पिलेले असल्याचं लक्षात आले.
तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
यानंतर डॉ. बनसोडे यांनी आपण सगळे कुठल्याही शासकीय रुग्णालयात जाऊ, मात्र तिथे माझ्यासोबतच तुम्हा तिघांचीही मेडिकल टेस्ट करू, असं म्हटलं. त्यामुळे बनसोडे यांना रुग्णालयाकडे घेऊन निघालेले हे तिघेही पोलीस त्यांना रस्त्यात उतरवून अक्षरशः पळून गेले. या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी आता थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच या तीन मद्यधुंद पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. स्वतः कर्तव्यावर असतानाही नशेत तर्र होऊन उलट आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांवर आरोप करणाऱ्या या तीन पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जातं आहे.
