Eknath Shinde Shivsena : मोठी बातमी, शिवसेनेचे आमदार नाराज, थेट एकनाथ शिंदेंकडे मांडल्या मनातल्या भावना
Eknath Shinde Shivsena : मागच्या महिन्यात परस्परांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देण्यावरुन शिवसेना-भाजप युतीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले.

राज्यात महायुतीचं सरकार आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन बनवलेलं हे सरकार आहे. दोन ते तीन पक्ष एकत्र सत्तेत असताना छोट्या-मोठ्या कुरबुरी, मतभेद होतच असतात. महायुती सुद्धा याला अपवाद नाही. तीन पक्ष म्हटल्यावर कुठल्या ना कुठल्या मुद्यावरुन आमदारांमध्ये मतभिन्नता असतेच. अलीकडच्या काही महिन्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये काही गोष्टींवरुन मतभेद झाले. खासकरुन निधीवरुन अनेक आमदारांच्या तक्रारी आहेत. सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. येत्या 21 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत.
मागच्या महिन्यात परस्परांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश देण्यावरुन शिवसेना-भाजप युतीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे पक्ष प्रवेश द्यायचं नाही असं ठरलं होतं. त्यानंतरही दोन्ही बाजूंमध्ये शाब्दीक वाद सुरु होते. आता विकास निधीवरून आणि अनेक महामंडळाचे वाटप न केल्यानं शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.
नाराजीचं कारण काय?
ग्रामीण भागातील दुसऱ्या टर्मचे शिवसेना आमदार , विधान परिषदेचे आमदार आणि मंत्री यांना विकास निधी मिळाला नसल्याने पुढील निवडणुकीत याचे परिणाम होण्याची शक्यता आहे. ती खंत आमदारांनी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढावा अशी विनंती शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडे निधीचा तुटवडा आहे तसेच लाडकी बहिण योजनेसाठी निधी दिला जात असल्याने अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.
