शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी, म्हणूनच… फडणवीसांच्या थेट विधानाने मोठी खळबळ, म्हणाले मला दु:ख…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगराच्या विकासासाठी भाजपाचा काय प्लॅन असेल याबाबत सांगितले. तसेच संभाजीनगरात शिंदे यांच्या पक्षाशी युती का होऊ शकली नाही, याचेही कारण त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोमात वाहत आहे. येत्या 15 जानेवारी रोजी राज्यात एकूण 29 महापालिकांसाठी मतदान होईल. त्यानंतर 16 जानेवारी रोजी निकाल लागेल. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक शहरात जाहीर सभा घेत आहेत. आता भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाच्या शहरात मुलाखत आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच फडणवीस यांची ठाण्यात मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी त्यांचे ठाण्याविषयीचे धोरण काय आहे? याबाबत सविस्तर सांगितले. आता छत्रपती संभाजीनगरातही त्यांचा टॉक शो आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांना संभाजीनगराच्या विकासाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीवरही त्यांनी भाष्य केले. विशेष म्हणजे संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेत गटबाजी असल्यानेच आमची युती तुटली, असे मोठे विधान त्यांनी केले.
यावेळी भाजपाचा अजेंडा काय असेल?
संभाजीनगरातील निवडणुकीत बाण की खान याच मुद्द्यावर व्हायची. याआधीच्या निवडणुकीत शिवसेना भाजपासोबत असायची. यावेळी मात्र छत्रपती संभाजीनगरात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यावेळी भाजपाचा अजेंडा काय असेल, असे यावेळी फडणवीस यांना विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना ‘ना बाण ना खान राखू भगव्याची शान’ असा नारा असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी सांगायचो की प्रयत्न सोडायचा नाही
पुढे बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरात शिवसेना आणि भाजपाची युती का तुटली? यावरही भाष्य केले. संभाजीनगरात युती टिकावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला. आमचे संभाजीनगरातील भाजपाचे नेते वैतागले. शिवसेना रोज एक नवा प्रस्ताव द्यायची. आमचे नेते वैतागून जायचे. परंतु मी सांगायचो की प्रयत्न सोडायचा नाही. आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने संभाजीनगरातील शिवसेनेत दोन वेगवेगळी मतं निर्माण झाली. आमच्याकडे नेतृत्त्वाने सांगितलं की विषय संपलेला असतो. छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेत दुर्दैवाने काही गट होते. त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की त्याच वेळी दुसरा नेता दुसरा त्या प्रस्तावात काहीतरी सांगायचा असे चार ते पाच वेळा झाले, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
संभाजीनगरात भाजपा हा एक नंबरचा पक्ष असेल
मी प्रत्येक वेळी सांगायचो की नव्याने प्रस्तावावर चर्चा करू. मी अनेकदा मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बोलले. त्यांनीही आमच्या प्रस्तावाला अनेकदा मान्यता दिली. परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे गट असल्याने ते शेवटपर्यंत निर्णय घेऊ शकले नाहीत. त्यांच्या आपापसातील भांडणामुळे ती युती तुटली. संभाजीनगरात युती तुटल्यामुळे मला दु:ख आहे असी भावनाही त्यांनी व्यक्त केली. परंतु युती नसली तरीही आम्ही शत्रू नाहीत. आमची ही लढत मैत्रीपूर्ण आहे. संभाजीनगरात भाजपा हा एक नंबरचा पक्ष असेल. आमच्या मागे आमचे मित्र असतील. शेवटी जेव्हा भगव्याचा विषय येईल तेव्हा आम्हाला विचार करावाच लागेल. आम्हाला बहुमत मिळालं तरी आणि नाही मिळालं तरीही आम्ही आमच्या मित्रांना सोडणार नाही, असे सांगत निवडणुकीनंतर संभाजीनगरात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले.
