भाजपची ताकद जास्त तरीही नमत का घेतलं? फडणवीसांनी सांगितली शिंदेंसोबतच्या युतीची इनसाईड स्टोरी
आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पार पडली, या मुलाखतीममध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचलं आहे, तसेच यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटासोबतच्या युतीवर देखील भाष्य केलं आहे.

आज ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पार पडली, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना शिवसेना शिंदे गटासोबतच्या युतीवर देखील भाष्य केलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र लढावं. कारण शेवटी असं आहे की, प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होत असते, ही निवडणूक दहा वर्षांनी आली होती. त्यामुळे ही निवडणूक दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करते. 2017 मध्ये एक पिढी तयार झाली, 2022 ला निवडणूक झाली नाही मात्र 2022 नंतर एक पिढी तयार झाली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर आपण युती केली तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यांना लढण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होते की आपण स्वतंत्र लढवावं असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान पुढे बोतलाना ते म्हणाले की, ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष बलशाली आहेत. त्यामुळे आमच्या लोकांना असं वाटत होतं की आता आपलं बळ वाढलेलं आहे. आपण त्या ठिकाणी जास्त नगरसेवक निवडूण आणू शकतो. त्यामुळे आपण तिथे स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. पण मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीसाठी आग्रह धरला. आपण नव्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची जी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, मी आमच्या येथील टीमचे आभार मानतो की मी आणि रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्यानंतर ते युतीसाठी तयार झाले. आम्ही इथे कमी जागा घेतल्या परंतु आम्ही इथे सोबत लढत आहोत. पण मला हे माहित आहे की, आमचा हा निर्णय बरोबर आहे, मुंबईतला निर्णय देखील बरोबर आहे.
तुम्ही जर कल्याण डोंबिवलीचा विचार केला त्या ठिकाणीही आमची अडचण झाली होती, त्या ठिकाणी आम्ही मोठा पक्ष झालो आहोत, मजबूत पक्ष झालो आहोत, मात्र तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी कमी जागा मिळाल्या. आम्हाला तिथे जास्त जागा हव्या होत्या, मात्र मागच्या वेळी शिवसेनेच्या तिथे जास्त जागा आल्या होत्या, इतरही काही नगरसेवक त्यांच्या पक्षात आले होते. त्यामुळे तिथेही आम्हाला कमी जागा घ्यावा लागल्या तशी परिस्थिती निर्माण झाली. पण रवीजींनी सर्वांना समजावून सांगितलं, आणि आम्ही पडती बाजू घेतली. एखादी सीट जास्त निवडूण येते, कधीकधी येत नाही. मात्र केवळ पाच, दहा जास्त सीट जास्त निवडून आणायच्या आहेत, म्हणून अट्टाहास न करता जिथे जिथे एमएमआर रिजनमध्ये आम्हाला एकत्र येणं शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र आलो. कार्यकर्त्यांची नेहमीच इच्छा असते, मात्र सर्व ठिकाणी परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यावा लागतो. आणि काहीही असलं तरी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत, आणि ठाणे ही त्यांची ओळख आहे. आणि त्यांची ओळख असलेल्या ठाणे शहरात त्यांना डिस्टर्ब करावं, मग आम्ही मित्र पक्ष कसले? म्हणून आम्ही निर्णय घेतला की शिंदे साहेब म्हणतील तसं आपण करू, आम्ही आमच्या लोकांना समजावलं, असं यावेळी फडणीस यांनी म्हटलं.
दरम्यान सध्या राजकारण ब्रॅण्डचं झालं आहे. मग आम्ही असं समजायचं का की शिंदे फडणवीस हा एक ब्रँड झाला आहे, असाही त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की असं आहे बघा मी नेहमी सांगतो या महाराष्ट्रात एकच ब्रँण्ड होता, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कोणी ब्रँण्ड नाही, मात्र एवढं नक्की मी आणि एकनाथ शिंदे आमची महायुती इतकी मजबूत आहे, आता कोणीही ब्रँण्ड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तर आम्ही त्यांचा बॅण्ड वाजवू, असं म्हणत त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना देखील डिवचलं आहे.
