जमादार विलास मोरे यांना राज्यपालांकडून खास निरोप

सध्या राज्यात सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने राजभवन आणि राज्यपाल चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राजभवनात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.

Jamadar Vilas More, जमादार विलास मोरे यांना राज्यपालांकडून खास निरोप

मुंबई: सध्या राज्यात सत्तास्थापनेचा पेच तयार झाल्याने राजभवन आणि राज्यपाल चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. राजभवनात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीतही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात 41 वर्षे सलग सेवा करणाऱ्या जमादारांना खास निरोप दिला आहे. जमादार विलास रामचंद्र मोरे (Retirement of Jamadar Vilas More) हे राजभवनातून निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्ताने कोश्यारी यांनी शनिवारी (9 नोव्हेंबर) जल सभागृह येथे मोरे यांना विशेष समारंभ आयोजित करून खास निरोप दिला.

विलास मोरे हे प्रामाणिक, कार्यतत्पर आणि विनम्र स्वभावाचे शिपाई होते. ते एका मोठ्या कालखंडाचे साक्षीदार होते. त्यांनी केलेल्या सेवेचे पुण्य त्यांनाच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीला देखील मिळेल, असं म्हणत राज्यपालांनी मोरे यांचं कौतुक केलं. तसेच त्यांच्या सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपालांनी विलास मोरे आणि त्यांच्या पत्नीचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

‘मी मागे उभा राहणारा साधा शिपाई’

मी साधा राज्यपालांच्या मागे उभा राहणारा शिपाई होतो. तरिही राज्यपालांनी राजभवनात अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेटण्यासाठीच्या शाही सभागृहात माझा सन्मान केला. हे मी आयुष्यभर विसरणार नाही, या शब्दात विलास मोरे यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यपालांचे खासगी सचिव उल्हास मुणगेकर यांनीही मोरे यांच्या कामाचं कौतुक केलं. मोरे कधीही उशिराने कार्यालयात आले नाही. त्यांनी कधीही कुठल्याही कामाला ‘नाही’ असं उत्तर दिलं नाही, असं निरिक्षण मुणगेकर यांनी नोंदवलं.

विलास मोरे कोण आहेत

विलास मोरे यांनी 1978 मध्ये संदेश वाहक या पदावर रुजू झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सादिक अली, ओ. पी. मेहरा, आय. एच. लतीफ, डॉ. शंकर दयाल शर्मा, कासू ब्रम्हानंद रेड्डी, सी. सुब्रमण्यम, डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासह 14 राज्यपालांची आणि कार्यवाहू राज्यपालांची सेवा केली, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दिली.

राज्यपालांसोबतच राजभवनातील राज्यपालांचे सचिव म्हणून काम केलेले सेवानिवृत्त उपलोकायुक्त जॉनी जोसेफ, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव सतीश त्रिपाठी, निवृत्त उर्जा सचिव सुब्रत रथो, ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी देखील विलास मोरे यांचा गौरव केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *