राज्यभरात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, नाशिकमध्ये ढगफुटी

राज्यभरात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालु्क्यात वणी येथे ढगफुटी (Heavy Rain) झाली आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, नाशिकमध्ये ढगफुटी

मुंबई: राज्यभरात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालु्क्यात वणी येथे ढगफुटी (Heavy Rain) झाली आहे. त्यामुळे वणी गावातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले. त्यात दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात गुडघ्यापर्यंत पाणी असल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागली. नाशिकमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस म्हणून वणी परिसरातील पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक

नाशिकमधील सप्तशृंगगडावर मुसळधार पाऊस झाल्याने डोंगरावरुन मोठ्या प्रमाणात धबधबे सुरु झाले. त्यामुळे धबधब्याचे पाणी थेट रस्त्यावर आले. हेच डोंगरावरुन पडणारे पाणी अनेक पर्यंटकांना मोहित करत आहे. पाऊस प्रचंड असल्याने वाहनधारकांना रस्त्याने मार्गक्रमण करणे अवघड जात आहे. मालेगाव तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.

दिंडोरी तालुक्यातील मावडी परिसरातही ढगफुटीचा पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील नद्या नाले दुथडी भरुन वाहत होते. मावडी येथे हायस्कुल असल्याने तेथे काही विद्यार्थीही फसले होते. नागरिकांच्या मदतीने त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. शिक्षणासाठी सरकार अनेक प्रयत्न करत असल्याचा दावा करते. शिक्षणाची दारं वाड्या-पाड्यांपर्यंत खुली झाल्याचंही सांगितलं जात आहे. असं असतानाही नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विद्यार्थ्यांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शासनाचे दावे खोटे असल्याचं मत नागरिकांना व्यक्त केलं आहे.

पुणे

पुण्यातील चिंचवडमध्ये देखील वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या परिसराला दुसऱ्यांदा परतीच्या पावसाने झोडपले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाळा संपत आला असला तरी सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, मोहोळ परिसरात झालेल्या पावसाने बळीराजा थोडासा सुखावला आहे. गावातील ओढ्यात पाणी आल्याने ओढे प्रवाहित झाले आहेत.

बीड

बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने बीड शहरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. बीडसह तालुक्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्री आणि पहाटेच्या दरम्यान अचानक झालेल्या धुव्वादार पावसाने बीड आणि वडवणी तालुक्यात दाणादाण उडाली. या पावसाने वडवणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. या ठिकाणी 2 तासात तब्बल 170 मिमी पावसाची नोंद झाली. बीड, वडवणीत आणि माजलगावात पाऊस झाला असताना परळी, गेवराई, आष्टी, शिरूर तालुका मात्र कोरडा ठाक आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या पावसाची अपेक्षा अद्याप कायम आहे.

परभणी

परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड या 6 तालुक्यांमध्ये रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने ओढया-नाल्यांना पूर आला. शेतातील अनेक भागात पाणी साचल्याने कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी निराश झाले.

वर्धा

वर्ध्याला देखील पावसानं पुन्हा झोडपलं. पावसाने विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. वर्ध्यात रात्रीदेखील पाऊस झाला. पुन्हा ऐन दुपारी पाऊस आल्याने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ झाली. शेतकऱ्यांनाही शेतीची कामे करण्यात खोळंबा निर्माण झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *