डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर सरकारला जाग, अखेर वाडा-भिवंडी मार्गावरील टोल बंद

वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला होता (Wada-Bhiwandi Doctor Death). दुगाडफाटा येथे झालेल्या या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. सरकारने सुप्रीम कंपनीचे या महामार्गावरील अनगाव आणि वाघोटे येथील टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत

डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर सरकारला जाग, अखेर वाडा-भिवंडी मार्गावरील टोल बंद

भिवंडी : वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला होता (Wada-Bhiwandi Doctor Death). दुगाडफाटा येथे झालेल्या या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. सरकारने सुप्रीम कंपनीचे या महामार्गावरील अनगाव आणि वाघोटे येथील टोलनाके बंद करण्याचे आदेश दिले आहेत (Wada-Bhiwandi Toll Naka Seized).

डॉ. नेहा शेखच्या मृत्यूनंतर (Wada-Bhiwandi Doctor Death) नागरिकांनी सुप्रीम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं होतं. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अखेर हे टोलनाके बंद केले, त्याशिवाय सुप्रीम कंपनीसोबत असलेला करारही रद्द करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी दिले. त्याचप्रमाणे ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेशही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.

सुप्रीम कंपनीने बांधकाम केलेला भिवंडी-वाडा माहामार्ग हा आर्धवट आणि निकृष्ट दर्जाचा असल्याने या महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे आतापर्यंत 350 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत. हजारो लोकांना कायमचं अपंगत्व आलं. त्यामुळे कंपनीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयाने कंपनीला सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कंपनीने ते पूर्ण केलं नाही. या सर्वांमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. नेहा शेख यांचाही या महामार्गावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन केलं आणि अखेर सरकारने सुप्रीम कंपनीवर कारवाई केली. याप्रकरणी कंपनीचे संचालक विक्रम शर्मा आणि चेतन भट यांच्याविरोधात कलम 420 आणि सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोकण विकास मंचचे सरचिटणीस महेंद्र ठाकरे यांनी दिली.

गेल्या 10 ऑक्टोबरला मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी अडकल्याने डॉ. नेहा शेख या तरुणीला अज्ञात वाहनाने चिरडलं होतं. या अपघातात डॉ. नेहा शेखचा जागीच मृत्यू झाला. मनोर-वाडा-भिवंडी या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात सातत्याने आंदोलनं होत आहेत. डॉ. नेहा शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा राम प्रसाद गोस्वामी यांचाही खड्डा चुकविताना ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होऊन कुडूस येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. सुमारे सात तासाहून अधिक काळ आंदोलकांनी वाडा-भिवंडी महामार्ग रोखून धरला.

सुप्रीम कंपनीच्या विरोधात रास्तारोको आंदोलनासह अनेकदा आंदोलने झाली आहेत. त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी काही नागरिकांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्चन्यायालयाने सहा महिन्यात महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश सुप्रीम कंपनीला दिले होते. मात्र, तरीही सुप्रीम कंपनीने दुरुस्ती न केल्याने निष्पाप लोकांचे बळी जात होते.

त्यानंतर सरकारने अखेर हे टोल बंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचे परिसरातील जनतेने स्वागत केले असून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *