नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, एकाच दिवशी 7 अर्ज मागे, 3 जागा बिनविरोध, आता लढाई फक्त 9 जागांची
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर मोठे बदल झाले. १० डिसेंबरला ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३ जागांवर बिनविरोध निवड झाली. आता उर्वरित ९ जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या १२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी १० डिसेंबर हा अंतिम दिवस महत्त्वाचा ठरला. या दिवशी एकूण 7 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात मोठे बदल झाले. तसेच यामुळे तीन जागांवर बिनविरोध निवड झाली आहे.
तीन जागांवर बिनविरोध विजय
जळगावमध्ये एकाच दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १२ जागांपैकी तीन जागांवर निवडणूक न होताच उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी, आता उर्वरित ९ जागांवर २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्यासाठी एकूण ४० उमेदवार रिंगणात कायम आहेत. जळगाव जिल्ह्यातल एकूण तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यातील भुसावळ नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक ५ ब मध्ये भाजपचे उमेदवार परीक्षित पुंडलिक बऱ्हाटे यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पितांबर चौधरी यांनी माघार घेतली. यामुळे भुसावळमध्ये भाजपने आतापर्यंत तीन जागांवर बिनविरोध विजय निश्चित केला होता, त्यात बऱ्हाटे यांच्या विजयामुळे ही संख्या चार झाली आहे.
अशोक चौधरी यांनी सलग दुसऱ्यांदा माघार घेतली आहे. याआधी त्यांनी प्रभाग २१ मधूनही वैयक्तिक कारणास्तव उमेदवारी मागे घेतली होती. ज्यामुळे भाजप उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. तर सावदा येथील तीनपैकी दोन वॉर्डातून फिरोजखान हबीबउल्ला पठाण आणि तब्बसुमबानो पठाण हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता जळगाव जिल्ह्यातील उर्वरित नऊ प्रभागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून खालील जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
| नगरपरिषद | प्रभाग क्रमांक | मतदानाची स्थिती |
| वरणगाव | १० अ आणि १० क | निवडणूक होणार |
| पाचोरा | ११ अ आणि १२ ब | निवडणूक होणार |
| भुसावळ | ४ ब आणि ११ ब | निवडणूक होणार |
| अमळनेर | १ अ | निवडणूक होणार |
| सावदा | ४ ब | दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत |
| यावल | ८ ब | निवडणूक होणार |
अंतिम निकालाकडे लक्ष
दरम्यान भुसावळच्या ४ ब आणि ११ ब या दोन प्रभागांत २० डिसेंबरला मतदान होणार आहे. या ठिकाणी ८,३८१ मतदारांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. या नऊ जागांसाठी मतदान झाल्यावरच येत्या २१ डिसेंबरला जिल्ह्यातील इतर नगरपरिषद निवडणुकीचे सर्व अंतिम निकाल जाहीर होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
